लवकरच पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे शिष्टमंडळ जाणार गडकरींच्या भेटीला
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर व औरंगाबाद दोन्ही शहरांचा कायापालट व औद्योगिक विकास होण्यासाठी पुणे-नागपूर समृध्दी महामार्ग निर्माण करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. लवकरच संघटनेचे शिष्टमंडळ व सामाजिक कार्यकर्ते गडकरी यांची या संदर्भात भेट घेणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम लवकरच पूर्णत्वाला जाणार आहे. त्यामुळे मुंबई-नागपूर प्रवासाच्या वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी गडकरी यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. केंद्र सरकार मधील सर्व मंत्र्यांपेक्षा वरच्या पातळीवर कार्यक्षमतेने काम फक्त गडकरी करत असल्याचे त्यांनी सिध्द केले आहे. विरोधकांनी देखील ही बाब मान्य केली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मागण्यांना गडकरी यांच्याकडून त्वरित प्रतिसाद मिळतो. पुणे-नागपूर समृद्धी महामार्गाची अत्यंत गरज आहे. विशेष म्हणजे या महामार्गासाठी फारच कमी खर्च येणार असून, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला औरंगाबाद जवळ पुणे-नागपूर समृद्धी महामार्ग नक्कीच जोडला जाऊ शकत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे ते नागपूर या प्रवासाचे अंतर 14 तासावरुन फक्त 9 तासावर आणण्यासाठी या समृध्दी महामार्गाची अत्यंत गरज आहे. औरंगाबाद ते पुणे अंतर जाण्यासाठी आज सुमारे 6 तास लागतात. विशेष म्हणजे शिक्रापूर ते पुणे अंतर जाण्यासाठी वाहतुक कोंडी असल्याचे फारच वेळ लागतो. पुणे-नागपूर समृद्धी महामार्गामुळे औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन्ही शहरांचा व जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकासासाठी या पुणे-नागपूर समृद्धी महामार्गाची अत्यंत गरज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील कित्येक हजार विद्यार्थी पुण्याला शिकतात. पुणे हे आयटीचे महाकेंद्र झालेले आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातून मोठ्या संख्येने आयटीचे इंजिनियर पुण्याकडे आकर्षित झालेले आहे. त्यामुळे नागपूर-पुणे दळणवळण अतिशय वेगाने करण्याची गरज आहे. रेल्वे खात्याकडून या संदर्भात फारशी अपेक्षा ठेवता येणार नसून, त्यांचे काम संथ गतीने असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. अहमदनगर आणि औरंगाबादला आर्थिक, प्रादेशिक आणि औद्योगिक ज्ञान मिळण्यासाठी पुणे नागपूर समृद्धी महामार्गाशिवाय पर्याय नसून, दोन्ही जिल्ह्यातील जनतेने या मागणीला पाठिंबा देण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. या मागणीसाठी अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, यमनाजी म्हस्के, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, अॅड. गवळी, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.