मल्लांवर रोख बक्षिसांचा वर्षाव
अहमदनगर(प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता.नगर) येथील ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेला जंगी कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला. मातीतल्या कुस्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामस्थांनी जंगी कुस्ती हगाम्याचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्लांनी आपल्या प्रेक्षणीय कुस्तीने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ग्रामस्थांनी मल्लांवर रोख बक्षिसांचा वर्षाव केला.
खंडोबाच्या यात्रेनिमित्त गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील ज्येष्ठ मल्लांच्या हस्ते ाखाड्याचे पूजन करुन कुस्त्यांना प्रारंभ करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, जिल्हा परिषद माजी सभापती रघुनाथ झिने, आखाडा प्रमुख पै. पोपट शिंदे, नगर तालुका तालिम संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, पारनेर तालुका तालिम संघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक पै. युवराज पठारे, संजय शिंदे, सरपंच संजय शिंदे, पै. प्रसन्न पवार, पंकज वाबळे, तुकराम वाबळे, पै. मिलिंद जपे, दत्ता नाट, बाबा नाट, रमेश आंग्रे, रावसाहेब कार्ले, जालिंदर चत्तर, अण्णा जाधव, अनिल डोंगरे, भरत फलके, पै. बाळू भापकर, सहदेव वाबळे, उपसरपंच युवराज कार्ले, दशरथ गव्हाणे, पप्पू वाबळे आदींसह ग्रामस्थ व मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रंगतादार कुस्त्यांचा खेळ ग्रामस्थांना पहावयास मिळाला. आखाड्यात पंच म्हणून वस्ताद उपमहाराष्ट्र केसरी पै. अनिल गुंजाळ, सरपंच पै. बंटी गुंजाळ, अजय अजबे, केवल भिंगारे यांनी काम पाहिले. शेवटची मानाची कुस्ती वैभव फलके (निमगाव वाघा) विरुध्द श्याम गव्हाणे (अंबिलवाडी) यांच्यात तसेच प्रेक्षणीय कुस्ती संदिप डोंगरे (निमगाव वाघा) विरुध्द आफताब शेख (नेप्ती), कृष्णा गव्हाणे (अंबिलवाडी) विरुध्द तेजस भोर (भोरवाडी) तसेच सौरभ शिंदे विरुध्द मोईन सय्यद यांच्यात लावण्यात आली. मानाची कुस्ती बरोबरीत सुटली.
पै. कृष्णा गव्हाणे याने कुस्ती चितपट करुन मानाची चांदीची गदा पटकाविली. तर या कुस्त्यांमध्ये संदिप डोंगरे व सौरभ शिंदे यांनी विजय संपादन केले. यात्रा उत्सव व हगामा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कुस्तीचे समालोचन अक्षय मुळूक यांनी केले.