एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या मुलांनी पारनेर नगर पंचायतीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच झालेल्या निवडणुकीत सेवानिवृत्त कर्मचारी स्व. सदाशिव औटी यांचे चिरंजीव विजय औटी नगरसेवकपदी निवडून येऊन त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. तर सेवानिवृत्त कर्मचारी स्व. फुलाजी चेडे यांचे चिरंजीव अशोक चेडे आणि निवृत्त कर्मचारी कालकथित भिमराव नगरे यांची नात हिमानी बाळासाहेब (रामजी) नगरे यांची नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात एस.टी.चे ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी गणपतराव पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे, डेपो सचिव माधवराव गाडीलकर, खजिनदार अर्जुन सबाजी औटी, ज्येष्ठ कामगार मनोहर महाजन, अय्युब शेख, एस.आर. शिंदे, निंबाळकर, लक्ष्मण ढवळे, एकनाथ औटी, पांडुरंग पवार, भास्कर औटी, नामदेव राहिंज, महेबूब राजे आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष विजय औटी म्हणाले की, निवडणुकीत सेवानिवृत्त एसटी कर्मचार्यांनी चांगले सहकार्य केले. त्यांच्या कुटुंबातील एक मुलगा नगराध्यक्ष झाला आहे. वडिल एस.टी. कर्मचारी होते. यामुळे त्यांच्या प्रश्नांची पुर्ण जाणीव आहे. चालक-वाहक मुख्य कामाच्या ठिकाणी गेल्यावर त्यांच्या राहण्याची, विश्रांती तर पारनेर बस स्थानक अद्यावत करण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे यांनी सन 1996 ते 2000 दरम्यान कामगार करारातील कपात केलेले 5 टक्के निधी परत मिळण्याबाबत सुरु असलेल्या चळवळीची माहिती देऊन, हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व सेवानिवृत्त कर्मचार्यांना एकत्रित येण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवराव गाडिलकर यांनी केले. एस.आर. शिंदे यांनी आभार मानले.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….