तहसिलदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला मोजमाप करण्याचे पत्र
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाचे अखेर मोजमाप करण्याचे लेखी पत्र तहसिलदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना दिले. तसेच अवैध वाळू उत्खनन होऊ नये यासाठी 24 तास पोलीस पथक नेमणुक करिता मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे पारनेर पोलीस स्टेशनला कळविले आहे. अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, संघटनेच्या वतीने स्थानिक शेतकर्यांसह नदीपात्रात करण्यात येणारे आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले आहे.
पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप करुन अहवाल तयार करण्यात यावा व अहवालानुसार वाळूचे अवैध उत्खनन करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. गेल्या दीड वर्षापासून सदर नदीपात्रातील अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी समितीच्या वतीने पाठपुरावा सुरु होता. याबाबत थेट नदीपात्रात उतरुन संघटनेने आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता. याची दखल घेत तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांनी तांत्रिक माहितीगार, अधिकारी-कर्मचारी नदीपात्रातील खड्ड्यांचे मोजमाप करून अहवाल सादर करण्यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना दिले आहे. सदर खड्ड्यांचे मोजमाप करून अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नदीपात्रातून यापुढे अवैध वाळू उत्खनन तसेच वाहतूक होऊ नये, याकरिता पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना नदीपात्राच्या ठिकाणी कायमस्वरूपी 24 तास पथक नेमणे करिता मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट केले आहे.