जय आनंद फाउंडेशनचा उपक्रम
जय आनंद फाउंडेशनने कोरोना काळात दिलेले सामाजिक योगदान कौतुकास्पद -हस्तीमलजी मुनोत
अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मशुध्दी व क्षमाभाव वृध्दींगत करणार्या जैन धर्मातील पवित्र अशा पर्युषण महापर्वास सुरुवात झाली आहे. 30 ऑगस्टपर्यंत सात दिवस चालणार्या या महापर्वानिमित्त शहरातील जय आनंद फाउंडेशन (ग्रुप) च्या वतीने डाळ मंडई येथे जैन बांधवांसाठी जेवणाची (ब्याळू) व्यवस्था करण्यात आली आहे. या ब्याळू उपक्रमाचा शुभारंभ नवकार महामंत्रचा जाप करून जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.
पर्युषण कालावधीत सूर्यास्तापूर्वी भोजन केले जाते. डाळ मंडई, आडतेबाजार, कापडबाजार, मार्केटयार्ड, त्याचप्रमाणे बाहेरगावाहून खरेदी करण्याकरिता येणार्या व्यावसायिक अशा सर्व जैन बांधवांना या भोजन व्यवस्थेचा लाभ घेता येणार आहे.
हस्तीमलजी मुनोत म्हणाले की, जय आनंद फाउंडेशन आठ वर्षापासून देत असलेली ब्याळू व्यवस्था अभिमानास्पद आहे. भोजन (ब्याळू) व्यवस्थेमुळे बाजार पेठेतील व्यापारी तसेच बाहेरगावाहून खरेदीसाठी येणार्या व्यापार्यांची सुद्धा ऊत्तम व्यवस्था झाल्याचे सांगत बाजारपेठेत ब्याळू व्यवस्था झाल्यामुळे घरातील महिलांना सुध्दा त्यांच्या धार्मिक कामाकरिता अधिक वेळ मिळणार असल्याचे सांगितले. तर समाजातील गरजूंना अन्न-धान्याची मदत करण्याचे त्यांनी आवाहन करुन फाऊंडेशनने कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.
प्रास्ताविकात अध्यक्ष रितेश पारेख यांनी जय आनंद फाउंडेशन (ग्रुप) च्या वतीने धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. राजेशकुमार कमलेशकुमार गुगळे यांनी ब्याळुसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. ब्याळूचे हे आठवे वर्ष असून, कोरोनामुळे या उपक्रमात दोन वर्ष खंड पडला होता. या उपक्रमास समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या कार्यक्रमासाठी बाबूशेठ लोढा, डॉ.विजय भंडारी, मनोज शेटीया, राजेशकुमार गुगळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष रितेश पारेख व सर्व सदस्य उपस्थित होते. मर्चंट् बँकेचे संचालक कमलेश भंडारी यांनी पर्युषण महापर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए किरण भंडारी यांनी केले. या उपक्रमासाठी जय आनंद फाउंडेशनचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहे.