श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ व आश्रय संस्थेचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवावर्ग एच.आय.व्ही. एड्स व क्षयरोगाला बळी पडत असताना या रोगाबद्दल जागृती होण्यासाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अमृतदिप प्रकल्प व आश्रय संस्थेच्या वतीने शहरातील सार्वजनिक ठिकाणी युवकांनी पथनाट्य सादर केले. तसेच तालुका पातळीवर ग्रामस्थांमध्ये व एमआयडीसी भागातील पाच हजारांहून स्थलांतरित कामगारांमध्ये ही जनजागृती करण्यात आली.
श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अमृतदिप प्रकल्प संचालिका वनिता गुंजाळ म्हणाल्या की, एच.आय.व्ही. एड्स हा आजार फक्त वैद्यकीय प्रश्न नसून, तो एक सामाजिक प्रश्न बनला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत्वे 15 ते 49 वयोगटात आहे. एखाद्या कौटुंबिक स्तरावर घरातील कमावती व्यक्ती बाधित झाल्यास संपूर्ण कुटूंब उघड्यावर येते आणि पर्यायाने समाजावर त्याचे विपरीत परिणाम होतात. यात युवकांचे प्रमाण जास्त असल्याने युवाशक्तीने ठरविल्यास या आजाराला प्रतिबंध करता येऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अमृतदिप प्रकल्प व आश्रय संस्थेने गुप्तरोग, एड्स व क्षयरोगाची समाजात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्ह्यातील स्थलांतरित कामगारांमध्ये गुप्तरोग, एचआयव्ही एड्स या आजारांवर जनजागृती करण्याचे योजिले आहे. या आजाराचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान ही जनजागृती मोहिम राबविण्यात आली आहे. जिल्ह्यातील वांबोरी, सुपा, केडगाव, अहमदनगर शहरातील चौकाचौकात, जिल्हा रुग्णालय आवार, गर्दीच्या ठिकाणे बस स्थानक, रेल्वे स्टेशन, एम.आय.डी.सी. येथील कंपन्या आदी ठिकाणी पथनाट्यातून युवकांनी जनजागृती केली.
या उपक्रमासाठी अमृतदिप प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापिका शुभांगी माने, समुपदेशक सागर विटकर, मुल्यमापन तथा लेखाधिकारी श्रीकांत शिरसाठ, क्षेत्रीय अधिकारी प्रसाद माळी, मच्छिंद्र दुधवडे, अनिल दुधवडे, ऋतिक बर्डे यांनी परिश्रम घेतले आहे. तर आश्रय संस्थेच्या स्वयंसेविका दिशा ढगे, प्रविण देशमुख, ज्योत्स्ना बोरसे, वैष्णवी जाधव, मंगल गायकवाड, ईश्वर भोरे यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले.