बदनामी केल्याप्रकरणी माजी सरपंचावर गुन्हा दाखल करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
धनवे यांनी खोटे आरोप न करता, पुराव्यानिशी गुन्हे दाखल करण्याचे खुले आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी यांची तक्रार केल्याचा राग धरुन त्यांची पत्नी असलेल्या माजी सरपंच उज्वला धनवे यांनी खोटे आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी केली आहे. तर धनवे यांनी खोटे आरोप न करता, पुराव्यानिशी गुन्हे दाखल करण्याचे खुले आवाहन करण्यात आले आहे.
पाच वर्षापुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीड जिल्ह्यात लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या व सध्या अहमदनगर जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून बदली होऊन आलेल्या त्या भ्रष्ट अधिकारीची हकालपट्टी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केली आहे. याचा राग धरुन माजी सरपंच उज्वला धनवे यांनी सामाजिक कार्यकर्ते रोडे यांच्यावर जातीवाचक बोलल्याचा व खंडणी मागितल्याचा खोटा आरोप केला आहे. या प्रकरणी तथ्य व पुरावे असल्यास धनवे यांनी गुन्हा दाखल करण्याची गरज होती. मात्र त्यांनी जाणीवपुर्वक बदनामी केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
खोटी तक्रार करुन धनवे यांनी प्रशासनाची दिशाभूल केली आहे. पती राजाचा गैरभार चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठोस पुरावे नसताना चुकीचे व खोटे आरोप करणार्या माजी सरपंच धनवे यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. एक महिन्याच्या आत संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.