• Wed. Dec 11th, 2024

पंजाबच्या सत्तापरिवर्तनाने देशाला ऑपरेशन पर्याय आणि लोकशाही डिच्चू कावा हे क्रांतीकारक शस्त्र मिळाले -अ‍ॅड. गवळी

ByMirror

Mar 12, 2022

पंजाबच्याधर्तीवर महाराष्ट्रात परिवर्तन घडविण्याचे नागरिकांना आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनाने देशाला ऑपरेशन पर्याय आणि लोकशाही डिच्चू कावा  हे क्रांतीकारक शस्त्र मिळाले असल्याचे स्पष्ट करुन पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने आम आदमी पार्टीच्या विजयाचे स्वागत केले असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
हरित क्रांतीला पंजाबने यश आणल्यामुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन भारतातील भूक-उपासमारी हटली. सध्या देशातील कोणत्याही राजकीय पक्षावर लोकांचा विश्‍वास राहिलेला नाही. अशा वेळेस आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये दुसरी क्रांती घडवून संपुर्ण देशाला नवीन मार्ग दाखविला आहे. भ्रष्टाचार आणि अनागोंदीवर नियंत्रण आणता येते, ही बाब दिल्लीतील राज्य सरकारने लोकांच्या मनावर बिंबवली. छत्रपती शिवाजी महाराजांची उन्नत शिवचेतना स्विकारुन त्याबाबत अंमलबजावणी केली, तर लोकांसमोर पर्याय उभा करता येतो. त्याला जनता आणि मतदार लोकशाही डिच्चू कावा वापरुन ग़ुट्टलबाज सत्तापेंढार्‍यांना सार्वजनिक जीवनातून दूर करू शकतात. ही बाब पंजाबच्या जनतेने दाखवून दिली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
 पंजाब मध्ये फुटीरवादी पुढार्‍यांनी जनतेला वेठीस धरले होते. भ्रष्टाचार आणि अनागोंदी शिगेला पोहोचली होती. त्यामुळे सामान्य जनता पुढार्‍यांना कंटाळली होती. अशावेळेस आम आदमी पक्षाचा पर्याय पंजाबच्या जनतेला भावला. महाराष्ट्रात सुद्धा ऑपरेशन पर्याय आणि लोकशाही डिच्चू कावा या दोन तंत्राचा वापर सन 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नक्कीच यशस्वी होऊ शकणार आहे. महाराष्ट्रातील सध्याचे सर्व पक्ष आणि लोकप्रतिनिधी अकाते आणि मकाते प्रवृत्तीचे आहेत. प्रत्येक पक्ष आम्हाला काय त्याचे? इतर लोकप्रतिनिधी मला काय त्याचे? अशा पद्धतीने वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन गुट्टलबाजी महाराष्ट्रात केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता सत्ताधार्‍यांच्या अकात्या व मकात्या प्रवृत्तीला वैतागली आहे. यामुळे राज्यातील जनता सध्याचे व पुर्वीच्या सत्ताधार्‍यांना डब्यात टाकल्याशिवाय राहणार नसल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
 जय शिवाजी घोषणेतून ऑपरेशन पर्याय हा मार्ग उपलब्ध होता आणि जय डिच्चू कावा यातून लोकशाही मार्गाने गुट्टलबाज सत्तापेंढार्‍यांना धडा शिकवता येतो. पंजाबच्या जनतेने लोकशाही क्रांतीच्या माध्यमातून संपूर्ण देशातील भ्रष्टाचाराची शासन पद्धती कायमचे दूर करता येते, हे दाखवून दिले आहे. अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांचा ऑपरेशन पर्याय आणि लोकशाही डिच्चू कावा जाहीर रितीने मान्य केला पाहिजे. यामुळे देशातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी संपविण्याच्या कार्याला गती मिळणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *