पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदेचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन-प्रशासनमध्ये सुरु असलेली अनागोंदी भ्रष्टाचार आणि टोलवाटोलवी थांबविण्यासाठी आम आदमी पार्टीने गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्येही पंजाबच्या धर्तीवर गुमक ब्रुम डिच्चू कावा राबविण्याचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री ना. अरविंद केजरीवाल यांना पाठविला असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
शासन-प्रशासनमध्ये अनागोंदी, भ्रष्टाचार आणि टोलवाटोलवी सुरू आहे. याला जबाबदार राजकीय पक्ष आहेत. पंजाबमध्ये अनागोंदीला पर्याय म्हणून पंजाबच्या जनतेने ऑपरेशन पर्याय वापरुन गुट्टलबाज सत्तापेंढार्या विरुध्द डिच्चू कावा वापरल्यामुळे काँग्रेस, भाजप व अकाली दलाचा सुपडासाफ केला आणि पंजाबमध्ये आपचे सरकार आले. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये भ्रष्टाचार आणि अनागोंदी शासन प्रशासनात मोठ्या प्रमाणात चालू आहे. पश्चिम भारतातील तिन्ही राज्यात आपचा झाडू चालवल्यास भ्रष्टाचार आणि अनागोंदी थांबून क्रांती घडून येणार आहे. याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या तीन्ही राज्यांमध्ये फ्रिन्ज लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर, को-ऑपरेटिव्ह इकोनॉमी या तंत्रातून लाखो बेघरांना स्वस्तात घरे आणि सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी भूखंड देण्याबाबतचा प्रस्तावही ठेवण्यात येणार आहे. सोलर एनर्जी व्हॅल्यू कॅप्चर योजनेद्वारे या तीन राज्यातील शेतकरी आणि दुबळ्या घटकांना सोलर एनर्जी युनिट लावण्यासाठी 80 टक्के अनुदान देणे, इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याबाबतचा विषय मांडण्यात येणार आहे. तर सत्तापेंढार्यांना कायमचे सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ऑपरेशन पर्याय कसा वापरता येईल यासाठी केजरीवाल यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.
आज जात, धर्म, पंथाचा मतं मिळवण्यासाठी सर्रास उपयोग होतो. त्याच वेळेला मतांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भाडभ्रष्ट उमेदवार निवडून येतात. महाराष्ट्रात 300 आमदारांना मुंबईत घरे कशासाठी द्यायचे हा संशोधनाचा विषय बनला आहे. पश्चिम भारतातील राज्यांमध्ये अनागोंदी टोकाला पोहोचली आहे. ब्रुम डिच्चू कावा व ऑपरेशन पर्याय वापरल्याशिवाय सामान्य माणसाला चांगले दिवस येणार नसल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले प्रयत्नशील आहेत.