• Wed. Dec 11th, 2024

नॉर्मल प्रसूती होऊनही विवाहित तरुणीचा मृत्यू

ByMirror

Sep 8, 2022

हलगर्जीपणामुळे तरुणीच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी

शेख कुटुंबीयांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

अहमदनगर (प्रतिनिधी)- नॉर्मल प्रसूती होऊनही विवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी हलगर्जीपणा करणार्‍या व तरुणीच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या शहरातील रामचंद्र खुंट, किंग गेट रोड येथील त्या हॉस्पिटलवर कारवाई करुन, डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याची मागणी शेख कुटुंबीयांनी केली आहे. तर मयत मुलीचा भाऊ सादिक शेख व वडिल शेरमोहम्मद शेख यांनी या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करुन निवेदन दिले.


आस्मा फैझान पटेल या विवाहित तरुणीला रामचंद्र खुंट, किंग गेट रोड येथील हॉस्पिटलमध्ये 5 सप्टेंबर रोजी प्रसूतीसाठी पहाटे दाखल करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता तिची नॉर्मल प्रसूती झाल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. मात्र नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता तिला दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेत पाठवून दिले. अहमदनगर महाविद्यालय जवळील एका हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन आयसीयूत दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथील डॉक्टरांशी चौकशी केली असता सदर तरुणीला मृत घोषित करण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

आस्मा पटेल या विवाहित तरुणीच्या मृत्यूस रामचंद्र खुंट, किंग गेट रोड येथील त्या हॉस्पिटलचा स्टाफ व डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप शेख कुटुंबीयांनी केला आहे. सदर हॉस्पिटलवर कारवाई करुन, डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याची मागणी शेख कुटुंबीयांनी केली आहे.

मुलगी प्रसूतीसाठी जुन्नरहून शहरात माहेरी आली होती. तिला केअर अ‍ॅण्ड क्युअर हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. मुलीची प्रसूती नॉर्मल होऊनही तिचा हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे. मुलीला त्रास होऊ लागल्याने ऑक्सिजन व रक्त देत असल्याचे सांगितले. तर काही वेळाने तिला श्रीदीप हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. काही वेळाने डॉक्टरांकडे विचारणा केल्यास मुलीला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूनंतर घटना पोलीसांना न कळविता मृतदेह नातवाईकांच्या ताब्यात देण्याची तयारी डॉक्टरांनी केली. मात्र शवविच्छेदनसाठी नातेवाईकांनी स्वत:हून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला. सदर हॉस्पिटलकडून मयत झाल्याचे पत्र देखील उशीरा देण्यात आल्याने सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर पोलीसांनी पंचनामा केला असून, शवविच्छेदनचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेतून येणे बाकी आहे. -शेरमोहम्मद शेख (मयत मुलीचे वडिल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *