वाडी-वस्तीवर 16 तास लाईट नसल्याने शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) गावात वाडी-वस्तीवर 16 तासाचे असलेले भारनियमनाने पाण्याअभावी पिकांचे होणारे नुकसान, भुरट्या चोर्यांचा वाढलेला त्रास व उकाड्याने त्रस्त असलेल्या संतप्त शेतकरी ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि.6 मे) नेप्ती फाटा येथे नगर-कल्याण महामार्गावर सकाळी रास्ता रोको आंदोलन केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात हमीदपूरचे सरपंच छबुराव कांडेकर, माजी उपसरपंच राजेंद्र होळकर, सुभाष जपकर, चेअरमन बाळासाहेब जपकर, माजी चेअरमन रघुनाथ होळकर, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होळकर, बबन कांडेकर, नितीन कदम, गोरख फुले, संतोष चौरे, हौशीराम जपकर, सतीश होळकर, भरत कांडेकर, बाबासाहेब पवार, शिवाजी जपकर, दिनेश फुले, कैलास बेल्हेकर, सर्जेराव होळकर, अशोक वाघ, राजू फुले, अशोक बेल्हेकर, भोला नेमाणे, मारुती जपकर, पोलीस पाटील अरुण होले, विलास लांडे, सागर गोरे, शरद पवार, आनंदा कर्डिले, बाळासाहेब बेल्हेकर, अरुण गडाख, संतोष होळकर आदींसह नेप्ती व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नेप्ती गाव परिसरात विद्युत महावितरणकडून 16 तासाचे भारनियमन सुरु आहे. विहिरीत पाणी असून, विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने उन्हाळ्याच्या तीव्रतेने पिके करपू लागली आहेत. कडबा कुट्टी मशीन लाईट नसल्याने बंद असून, शेतकर्यांबरोबर मुक्या जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे महिला व लहान मुलांना घरात थांबणे असह्य झाले आहे. रात्री अंधाराचा फायदा घेऊन भुरट्या चोर्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे संपूर्ण ग्रामस्थ त्रस्त झालेे आहेत.
16 तासाचे भारनियमन कमी करावे, थ्री फेज गेल्यानंतर सिंगल फेज वरील विद्युत पुरवठा कायम ठेवण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. आंदोलन स्थळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण) किसन कोपनर व सहाय्यक अभियंता दुर्गेश साखरवडे यांनी भेट देऊन निवेदन स्विकारले व भारनियमन कमी करण्याबाबतचे लेखी आश्वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. लेखी आश्वासनात फिडरवरती विशेष रोहित्र (एसडीटी) नसल्याने सिंगल फेज वीज उपलब्ध करुन देण्यात अडचण निर्माण होत होती. सदरील फिडरवरती विशेष रोहित्र (एसडीटी) बसविण्याचे आदेश देण्यात आले असून, लवकरात लवकर काम पूर्ण होऊन 8 तास व्यतिरिक्त वाडी-वस्तीवर सिंगल फेजसाठी वीज उपलब्ध करुन देण्याचे म्हंटले आहे. सदर प्रश्न मार्गी न लावल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर यांनी दिला. भारनियमन विरोधात करण्यात आलेल्या रास्तारोकोसाठी नगर तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय युवराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा चोख बंदोबस्त होता.