उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडांच्या विविध तपासण्या
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आम आदमी पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात ग्रामस्थांची उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडांच्या विविध तपासण्या करुन अल्पदरात औषधचे वाटप करण्यात आले.
समता परिषदेचे नगर तालुका अध्यक्ष रामदास फुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. आहार तज्ञ डॉ. शाहिन शेख यांनी आजार होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. याच्या जनजागृतीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य माहिती देण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. समाज निरोगी व सुदृढ राहण्यासाठी आरोग्य शिबीर घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच सुधाकर कदम व उपसरपंच जालिंदर शिंदे यांनी सर्व डॉक्टर व परिचारिकांचे स्वागत केले.
या शिबीरास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. वाडी-वस्तीवरील ग्रामस्थांनी शिबीरात सहभाग नोंदवून विविध तपासण्या करुन घेतल्या. यावेळी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष तुकाराम बेल्हेकर, उपाध्यक्ष जमीर सय्यद, सत्तार सय्यद, समीर शेख, सचिन जपकर, रामदास कल्हापुरे, प्रा. एकनाथ होले, पै. दादू चौगुले, अदनान शेख, उज्वला कन्हेकर, रामदास होले, पप्पू राऊत, संतोष चहाळ, दिनेश भोळकर, समीना शेख आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.