ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात गोरगरीब ग्रामस्थांच्या सोयीसाठी नवीन आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीसाठी अभियान राबवून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. आर.के. ग्राफिक्स व ऑनलाईन सर्व्हिसेस, बँक ऑफ बडोदा तसेच समता परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमास गावातील वाडी-वस्तीवरील ग्रामस्थांचा उस्फुर्त सहभाग लाभला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तीनी आधार नोंदणीसह त्यात आवश्यक असलेला बदल करुन घेतला.
या उपक्रमाचे उद्घाटन समता परिषदेचे नगर तालुका अध्यक्ष रामदास फुले यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र होळकर, आर.के. ग्राफिक्सचे संचालक राहुल कांडेकर, ऑपरेटर विकी मिसाळ, शाहू होले, मनोहर ठुबे, बापू जपकर, सचिन खरमाळे, सुरेश कार्ले, अक्षय कांडेकर, शिवांजली कांडेकर, सोनाली होळकर, वंदना नेमाणे, राजश्री कोल्हे, मंदा इंगोले, राजश्री होळकर आदी उपस्थित होते.
या अभियानात लहान मुलांचे नवीन आधार कार्ड काढणे, ग्रामस्थांच्या आधार कार्डमध्ये पत्ता बदलणे, नाव दुरुस्ती अथवा बदल करणे, फोटो अपडेट करणे, जन्मतारीख दुरुस्त करणे, प्रधानमंत्री किसान योजना साठी लागणार्या केवायसीसाठी मोबाईल नंबर अपडेट करुन लिंक करणे आदी कामे मोफत करुन देण्यात आली. तसेच विविध शासकीय योजनांची यावेळी माहिती देण्यात आली.
विविध सरकारी व निमसरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर कामांसाठी आधारकार्ड अत्यावश्यक बनले आहे. गावातील गोरगरीब वाडी-वस्तीवरील ग्रामस्थांना शहराच्या ठिकाणी महा-ई-सेवा केंद्रात जाऊन कुटुंबीयांचे आधार कार्ड काढणे व दुरुस्ती करणे वेळ व पैश्यामुळे शक्य होत नाही. नागरिकांची होणारी धावपळ, वेळ व पैसे वाचविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आधार कार्ड व अन्य योजनांच्या कागदपत्रांसाठी नागरिकांना पायपीट करण्याची वेळ येते. ग्रामस्थांना तासनतास ताटकळत बसावे लागत होते. या अभियानामुळे गोरगरीब नागरिकांचे मोफत काम झाल्यामुळे सरपंच सुधाकर कदम, उपसरपंच जालिंदर शिंदे व शिवाजी होळकर यांनी संबंधित आयोजकांचे आभार मानले.