गावातील विविध ठिकाणी अभिवादन करुन, बाबासाहेबांचा जयघोष
डॉ. बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर विद्यार्थी व युवकांना पुस्तके वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील नवनाथ विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय व आंबेडकर वस्तीत जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील विविध ठिकाणी अभिवादन करुन, बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.
नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर सार्वजनिक ग्रामीण वाचनालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसह जयंती साजरी करण्यात आली. विद्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर आंबेडकर वस्तीत डॉ. बाबासाहेबांचा पुतळा स्टेजवर विराजमान करुन त्या भोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती. शालेय विद्यार्थी व युवकांना धर्मवीर सार्वजनिक ग्रामीण वाचनालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, दत्तात्रय जाधव, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, कलाशिक्षक उत्तम कांडेकर, मुस्ताक शेख, तुकाराम खळदकर, उपसरपंच अलका गायकवाड, डॉ. विजय जाधव, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, अनिल डोंगरे, शंकर गायकवाड, निलेश आंग्रे, अरुण काळे, अतुल फलके, पोलीस कॉन्स्टेबल मनिषा गायकवाड, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, दादा गायकवाड, अजय ठाणगे, दिपक जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, वंचितांच्या उध्दारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संघर्ष करुन समाज परिवर्तनाचे ते महानायक ठरले. सामाजिक समतेसाठी विषमतेविरोधात तर न्यायासाठी अन्यायाविरोधात त्यांनी लढा दिला. शतकानुशतके वंचित असलेल्या समाजाला त्यांनी सन्मानाने जगण्याचा अधिकार त्यांनी मिळवून दिला. समतेवर आधारित नवसमाजाचे स्वप्न त्यांनी साकारले. अस्पृश्यता आणि जातीव्यवस्थेच्या अंधारात प्रकाशवाट निर्माण करुन त्यांनी न्याय प्रस्थापित केले. आजही समाज जाती व विषमतेच्या बंधनात अडकला जात असताना या महामानवाचे विचार व कार्याने बदल घडून दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.