निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची गरज -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे संत गाडगे महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, नवनाथ विद्यालय व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीच्या संयुक्त विद्यमाने गावात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी नवनाथ विद्यालयात गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, ग्रामपंचायत सदस्य तथा गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, नामदेव भुसारे, दत्तात्रय जाधव, निळकंठ वाघमारे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, वाचनालयाचे उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे, सचिव मंदाताई डोंगरे, मयुर काळे, विजय भुसारे, सनी शिंदे, तात्या नरवडे, दत्ता जाधव आदी उपस्थित होते.
गावातील बिरोबा मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाद्वारे स्वच्छतेतून निरोगी आरोग्याचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी सार्वजनिक स्वच्छता ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून, नागरिकांचे देखील कर्तव्य आहे. युवकांसह नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छतेला चळवळीचे स्वरुप दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सार्वजनिक स्वच्छता ही एका दिवसा पुरती मर्यादित न ठेवता दररोज नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची गरज असून, स्वच्छ व सुंदर भारत घडविण्यासाठी नागरिकांनी योगदान देण्याची गरज आहे. परिसर स्वच्छ असल्यास साथीचे आजार न पसरता नागरिकांचे आरोग्य चांगले राहते. संत गाडगे महाराजांनी काळाची गरज ओळखून सार्वजनिक स्वच्छतेसाठी कार्य केले होते. त्यांचे कार्य आजच्या काळात दिशादर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमास नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांचे मार्गदर्शन लाभले.