युवकांनी घेतली पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नवनाथ विद्यालयाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून, आमली पदार्थाची होळी करण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थी व युवकांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी नवनाथ विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. जमा झालेल्या झाडांच्या पाला-पाचोळ्याची होळी पेटविण्यात आली. होळीत मावा, गुटखा, तंबाखू, विडी, दारुच्या बाटल्या, सिगारेट टाकून आमली पदार्थांचे दहण करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे-ठाणगे, साहिल कापसे, प्रतिक फलके, साहिल पुंड, आदेश जाधव, प्रतिक भूसारे, शंभू कापसे, गौरव आंभे, गौरव सुंबे, सार्थक उकांडे, क्षितीज कदम, सुरज निमसे, शिवम कापसे, मंदाताई डोंगरे आदी उपस्थित होते.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, युवकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. तंबाखू, विडी सिगारेटमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. देशात कॅन्सरचे प्रमाण छपाट्याने वाढत असून, त्याला तंबाखू, विडी सिगारेट प्रमुख कारण ठरत आहे. तर दारुने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. युवकांनी व्यसनांची होळी करुन निरोगी जीवन जगावे. होळीसाठी लाकूड न जाळता वाळलेला पाला, पाचोळा जाळल्यास एक पर्यावरणपुरक होळी साजरी करता येणार असल्याचे सांगून, पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीचे आवाहन केले. संदिप डोंगरे यांनी गावात स्वच्छता मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून, यामुळे गाव निर्मळ व निरोगी होणार असल्याची आशा व्यक्त केली. या उपक्रमास नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालयाचे मार्गदर्शन लाभले. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.