शहिद जवान जाधव यांच्या शौर्याच्या आठवणींना उजाळा
शहिद जवानाच्या स्मारकाद्वारे युवकांना देशसेवा, शौर्य व बलिदानाची प्रेरणा -अतुल फलके
अहमदनगर (प्रतिनिधी)- अवघ्या चोविसाव्या वर्षी देशासाठी शहीद झालेले निमगाव वाघा (ता. नगर) येथील शहिद जवान गोरख नाना जाधव यांच्या स्मारकावर अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. गावातील शहिद जवान गोरख जाधव यांच्या आठवणींना उजाळा देऊन, त्यांनी दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यात आले. एकता फाऊंडेशन ट्रस्ट, वीर शहिद जवान गोरख जाधव मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
माजी सैनिक रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गावात शहिद जवान गोरख नाना जाधव यांच्या स्मारकाचे कामे अंतिम टप्प्यात असून, पहिल्यांदाच त्यांच्या स्मारकावर स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. भारत माता की जय…, वीर शहिद जवान गोरख जाधव अमर रहे!… च्या घोषणांनी गाव परिसर दुमदुमले. यावेळी सरपंच रूपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, सोसायटी सदस्य तथा एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, शिक्षण समिती अध्यक्ष अनिल डोंगरे, नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर शिंदे, रामदास पवार, सागर फलके, अक्षय ठाणगे, हुसेन शेख, अरुण अंधारे, विकास जाधव, सुधीर खळदकर, राहुल फलके आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
अतुल फलके म्हणाले की, शहिद जवान गोरख जाधव यांच्या स्मारकाद्वारे युवकांना देशसेवा, शौर्य व बलिदानाची प्रेरणा मिळते. अनेक अतिरेकींना कंठस्नान घालून त्यांनी आपले शौर्य दाखवले. त्यांच्या शौर्याच्या आठवणी आजही गावाच्या स्मरणात असून, त्यांची प्रेरणा घेऊन अनेक गावातून युवक लष्करात देशसेवेसाठी दाखल झाले असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सैनिक रामदास कदम यांनी एका वीर जवानाच्या स्मारकावर तिरंगा फडकवून अभिमान वाटत असून, गावातील हा सोहळा देशभक्तीसाठी स्फुर्ती देणारा असल्याचे सांगितले.
उद्योजक दिलावर शेख, रामदास कदम, जयवंत जाधव, एकनाथ जाधव, तुळशीराम वाघुले, मयूर काळे, ज्ञानदेव कापसे, अजय चाबुकस्वार, सहदेव जाधव यांनी शहिद जवान गोरख जाधव यांच्या स्मारकासाठी आर्थिक मदत दिली. सदर स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असून, याचा लोकार्पण सोहळा 20 डिसेंबर रोजी करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पै. नाना डोंगरे यांनी केले. आभार जालिंदर जाधव यांनी मानले. यावेळी आजी-माजी सैनिक, जाधव परिवार, नवनाथ विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, एकता फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
एका शेतकरी कुटुंबातून आलेले गोरख जाधव यांनी बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन देशसेवेसाठी लष्करात दाखल झाले. त्यांची 16 मराठा बटालियन मध्ये नियुक्ती झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची शांतीसेना श्रीलंका येथे नियुक्ती झाली. यामध्ये त्यांनी अनेक अतिरेकींना यमसदनी धाडून दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांची नागालँड येथे स्पेशल आर्मी फोर्स मध्ये नियुक्ती करण्यात आली. बोडो अतिरेकी कारवाईतही त्यांनी पुन्हा आपल्या शौर्याची प्रचिती दिली. अखेर 20 डिसेंबर 1993 रोजी अतिरेक्यांबरोबर लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांनी देशाची पाच वर्षे सेवा केली. युद्धात दाखवलेल्या शौर्य व कामगिरीमुळे त्यांच्या बटालियनला देशातील सर्वोच्च अशोकचक्राने सन्मानित करण्यात आले.