शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन युवकांनी संकटांना न घाबरता निर्व्यसनी राहून यशाकडे वाटचाल करावी -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन व्यसनमुक्तीचा जागर करीत साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, भानुदास लंगोटे, मंदाताई डोंगरे, लहानबा जाधव आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
गावातील नवनाथ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सध्या युवा वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात असून, व्यसनाचे दुष्परिणाम दर्शवणारे पोस्टरचे अनावरण विद्यार्थ्यांनी केले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. टाळेबंदीनंतर नैराश्यामुळे अनेक युवक व्यसनाच्या आहारी गेले आहे. ज्या वयात शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले त्या वयात युवा वर्ग व्यसनामुळे आपले जीवन उध्वस्त करीत आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन युवकांनी संकटांना न घाबरता निर्व्यसनी राहून यशाकडे वाटचाल करण्याचे त्यांनी सांगितले. निळकंठ वाघमारे म्हणाले की, महापुरुषांचा आदर्श व आई- वडिलांचा त्याग समोर ठेऊन व्यसनापासून युवकांनी लांब रहावे. देशातील युवाशक्तीच्या सहकार्यानेच अनेक प्रश्न सुटणार आहे. शिवरायांचा आदर्श घेऊन समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.