पर्यावरण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता व स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी व्याख्यान
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नवनाथ विद्यालयाच्या वतीने पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमातंर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता व स्त्रीभ्रुणहत्या या विषयावर व्याख्यानाद्वारे जनजागृती करण्यात आली.
कवी बाळासाहेब अमृते व्याख्यानात म्हणाले की, पर्यावरणावर शाश्वत विकास अवलंबून आहे. तर व्यसनमुक्तीने युवा पिढी सक्षम होणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेने भारत विकासाकडे झपाट्याने वाटचाल करु शकतो. सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज बनली आहे. स्पर्धेच्या युगात युवक ताण-तणाव व निराशेमुळे व्यसनाच्या आहारी जात आहे. कमी वयातच व्यसनाधिन झालेले युवक दिसत असून, त्यांच्यामध्ये जागृती करण्याची गरज आहे. तसेच स्त्रीभ्रुणहत्या हा गंभीर प्रश्न समाजासमोर असून, यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी, नशेच्या आहारी जाऊन युवा वर्ग आपले जीवन उध्वस्त करीत आहे. व्यसन फक्त श्रीमंत वर्गा पुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील तरुण देखील यामध्ये ओढले गेल आहे. युवकांमध्ये जागृती करुन भावी पिढी बर्बाद होण्यापासून रोखता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक किसन वाबळे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, अशोक डौले, भानुदास लंगोटे, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, तुकाराम खळदकर, लहानबा जाधव आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, दिपाली बोडखे, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.