वृक्षवल्ली आंम्हा सोयरे… या अभंगातून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
वसुंधरेचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी -अतुल फलके
अहमदनगर (प्रतिनिधी)- एकता फाउंडेशन ट्रस्ट व नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षदिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. दिंडीत सहभागी झालेल्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश दिला. तर संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आंम्हा सोयरे… या अभंगावर झाडांचे महत्त्व पटवून देणारे कीर्तन सादर केले.
या वृक्ष दिंडीत एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सोसायटीचे संचालक अतुल फलके, अरुण अंधारे, अजय ठाणगे, किरण जाधव, ह.भ.प. विठ्ठल फलके, ह.भ.प. दत्तात्रय फलके, ह.भ.प. चंदू जाधव, अनिल डोंगरे, अरुण कापसे, पिंटू जाधव, तुकाराम कापसे, किशोर काळे, संदीप येणारे, रंगनाथ शिंदे, विजय जाधव, मारुती जाधव, छगन कापसे, प्रवीण फलके, सचिन कापसे आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
अतुल फलके म्हणाले की, वसुंधरेचे संरक्षण, संवर्धन किंवा प्रदूषण नियंत्रण ही केवळ शासनाच्या माध्यमातून शासनाने नियंत्रित करण्याची बाब राहिलेली नाही. तर निसर्ग आणि मानव यातील नाते संबंध समजून घेऊन समाजातील विविध घटक, संस्था यांनी सकारात्मक भूमिकेतून एकत्र येऊन वसुंधरेचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी बनली आहे. यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन पर्यावरण संवर्धनाचे त्यांनी आवाहन केले.
टाळ-मृदंग, भगवे झेंडे हातात घेऊन निघालेल्या या वृक्षदिंडीने गावात उत्साह संचारला होता. दिंडीद्वारे विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश दिला. दिंडीचा समारोप वृक्षरोपणाने करण्यात आला. तसेच गावात भुसारे कोचिंग क्लासेसच्या वतीने सचिन जाधव, युवराज भुसारे व जालिंदर जाधव यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.