धार्मिक एकतेचा संदेश देऊन राबवलेल्या आरोग्य शिबीराला ग्रामस्थांचा प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे धार्मिक एकतेचा संदेश देत ग्रामस्थांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, स्वस्तिक नेत्रालय व वैष्णवी ऑप्टीकल्सच्या वतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. विजय जाधव, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, दिगंबर जाधव, डॉ. वैष्णवी जरबंडी, सचिन कापसे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, जालिंदर आतकर, दिपक जाधव, मुश्ताक शेख, शिवाजी कापसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, मानव सेवेत ईश्वर सेवा असून, सण-उत्सव सामाजिक उपक्रमाने साजरे झाले पाहिजे. समाजात अनेक उपेक्षित घटक असून, त्यांना विविध सामाजिक उपक्रमाने हातभार लागत असतो. महागाईच्या काळात आरोग्य सेवा मोठी खर्चिक झाल्याने मोफत आरोग्य शिबीर आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील नवनाथ मंदिराच्या सभा मंडपात झालेल्या या शिबीरास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. डॉ. वैष्णवी जरबंडी यांनी 110 ग्रामस्थांची नेत्र तपासणी केली. या शिबीरात सहभागी झालेल्या 25 गरजू लाभार्थ्यांवर अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.