एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन जातीय सलोख्याचे दर्शन
श्री नवनाथ युवा मंडळ व डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गावात स्वच्छता अभियान
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे बकरी ईद व आषाढी एकादशी उत्साहात साजरी करुन ग्रामस्थांनी धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले. गावात सकाळी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज पठण केली. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधीवत पूजा पार पडली. तर बाल वारकर्यांचा दिंडी सोहळा रंगला होता. या दोन्ही धार्मिक सोहळ्यात सर्व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून जातीय सलोखा राखला.
श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन निघालेल्या बाल वारकर्यांच्या दिंडीचे स्वागत करण्यात आले. तर गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी 9 वाजता गावात ईदची नमाज झाली. मौलाना इलियास यांनी नमाज पठण केले. यावेळी शांतता व समृध्दीसाठी अल्लाह चरणी प्रार्थना करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थांच्या हस्ते आरती करण्यात आली. ईद व आषाढी एकादशीच्या ग्रामस्थांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या स्वच्छता अभियानात ग्रामस्थांनी स्वयंफुर्तीने सहभाग घेतला. यावेळी चांद शेख, नवाब शेख, ह.भ.प. विठ्ठल फलके महाराज, राजू जाधव, भाऊसाहेब डोंगरे, जावेद शेख, चर्च प्री स्कूलच्या प्राचार्या जया दरक, उपप्राचार्य सुरज दरक, तुकाराम फलके, गुड्डू शेख, भानुदास ठोकळ, कादर शेख, सलिम शेख, पांडुरंग गुंजाळ, गोरख चौरे, साहेबराव बोडखे, मोहसीन शेख, कोंडीभाऊ फलके, नामदेव फलके, युनूस शेख, गोरख फलके, पिंटू जाधव, नारायण शिंदे, संदीप डोंगरे, आनंद गावडे, दिलीप शेख, सचिन कापसे, अन्सार शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
चर्च प्री स्कूलच्या आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बालवारकर्यांच्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले. श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. डोक्यावर टोपी, पायजमा, बंडी या पोशाखात लहान मुले तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन डोक्यावर तुलस घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष केला. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभुषेत सहभागी झालेले विद्यार्थी या दिंडीचे आकर्षण ठरले.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्व धर्मिय गुण्यागोविंदाने नादतात, ही पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आहे. बकरी ईद व आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा प्रत्यय सर्वांना आला. सुफी-संतांच्या पावन भूमीत जात, धर्म व पंथाचा भेदभाव होत नाही. माणुसकी हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले. पीएसआय युवराज चव्हाण यांनी या उपक्रमास भेट देऊन गावात राबवलेल्या जातीय सलोख्याच्या कार्यक्रमाबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले. दिंडीतील बाल वारकर्यांना शाबुदाणा खिचडीचे वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.