कोरोनानंतर गरीब, श्रीमंता मधील दरी वाढली -पै. नाना डोंगरे
स्वास्तिक नेत्रालय, वैष्णवी ऑप्टीकल्स, निमगाव वाघा ग्रामपंचायत व डोंगरे बहुद्देशीय संस्थेचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनानंतर गरीब, श्रीमंता मधील दरी वाढली असून, सर्वसामान्यांना खर्चिक आरोग्य सुविधा मिळणे कठीण झाले आहे. सामाजिक संघटना व हॉस्पिटलच्या वतीने राबविण्यात येणारे शिबीर सर्वसामान्यांसाठी आधार ठरत आहे. मनुष्याच्या हव्यासापोटी मनाचे व शरीराचे स्वास्थ्य बिघडत आहे. चुकीची आहार पध्दती व व्यायामाच्या अभावाने आजार जडत असून, व्यायाम व योग्य आहाराने शरीर स्वास्थ्य चांगले ठेवण्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी केले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वास्तिक नेत्रालय, वैष्णवी ऑप्टीकल्स, निमगाव वाघा ग्रामपंचायत व स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी डोंगरे बोलत होते. यावेळी लक्ष्मण चौरे, एकनाथ डोंगरे, विजय जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, डॉ. ओंमकेश कोंडा, डॉ. वैष्णवी जरबंडी, दिगंबर जाधव, भास्कर फलके, पोपट जाधव आदी उपस्थित होते.
गावातील सावता महाराज मंदिराच्या सभा मंडपात झालेल्या या शिबीरास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. डॉ. ओंमकेश कोंडा व डॉ. वैष्णवी जरबंडी यांनी ग्रामस्थांची नेत्र तपासणी केली. या शिबीरात सहभागी झालेल्या गरजू लाभार्थींवर अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सरपंच रुपाली जाधव व डॉ. विजय जाधव यांनी शिबीराचे कौतुक केले. आभार संदिप डोंगरे यांनी मानले.