ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
आधार कार्ड ही नागरिकांसाठी अत्यावश्यक बाब -अतुल फलके
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांसाठी एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने आधार नोंदणी व दुरुस्ती कॅम्प घेण्यात आले. या शिबीरास ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थी व युवक-युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले देण्याची देखील सोय करण्यात आली होती.
या शिबीराप्रसंगी डॉ. विजय जाधव, एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, रामदास पवार, किरण जाधव, वैभव पवार, सुधीर खळदकर, बाबा गायकवाड, अभिषेक गायकवाड, वैभव पवार, निलेश कापसे, सोमनाथ फलके, अजित फलके, अनिल जाधव, अंबादास जाधव, मयूर काळे, नंदलाल ठाणगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावात झालेल्या या शिबीरात नवीन आधार नोंदणी करण्यात आली. तसेच आधार कार्ड मधील इतर दुरुस्ती व मोबाईल क्रमांक व पत्ता अद्यावत करुन देण्यात आला. आधार कार्ड ही नागरिकांसाठी अत्यावश्यक बाब बनली आहे. जन्मलेल्या बाळापासून ते वृध्दांना आधार कार्ड अनिवार्य व गरजेचे बनले आहे. अनेक सरकारी कामे, योजना व इतर कामांसाठी आधार कार्डची गरज भासते. तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियांसाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज भासते. शहरात ठराविक आधार नोंदणी केंद्र असल्याने नागरिकांची त्या ठिकाणी गर्दी होते. ग्रामस्थांची सोय होण्यासाठी या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास ग्रामस्थांना चांगला प्रतिसाद लाभल्याचे अतुल फलके यांनी सांगितले.