डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचा संयुक्त उपक्रम
विद्यार्थ्यांना ध्येय प्राप्तीसाठी पाठीवरती शाबासकीची थाप देणे आवश्यक -ज्ञानदेव लंके गुरुजी
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथील नवनाथ विद्यालयातील इयत्ता दहावी बोर्डाच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ज्ञानदेव लंके गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा बँकेचे माजी संचालक रावसाहेब पाटील शेळके, नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, सचिव भागचंद जाधव, मुख्याध्यापक किसन वाबळे, उद्योजक बाळासाहेब शहाणे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, पंचायत समिती विस्तार अधिकारी बाळासाहेब तुपे, डॉ. विजय जाधव, उद्योजक अजय लामखडे, भाऊसाहेब ठाणगे, गोकुळ जाधव, अण्णा जाधव, नामदेव फलके, गोरख चौरे, चांद शेख, उद्योजक कोंडीभाऊ फलके, दत्तात्रय जाधव, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व पाठीवरती शाबासकीची थाप देण्यासाठी दरवर्षी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. अनेक विद्यार्थी या शाळेतून घडले असून, ते विविध पदाच्या माध्यमातून कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानदेव लंके गुरुजी म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडी-अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा अडचणींवर मात करुन विद्यार्थी पुढे जात असून, विद्यालय देखील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी पूर्णपणे योगदान देत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य शिक्षणाने घडणार आहे. विद्यार्थ्यांना ध्येय प्राप्तीसाठी पाठीवरती शाबासकीची थाप देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रताप पाटील शेळके म्हणाले की, मराठी माध्यमांकडे पालकांचा कल वाढत असून, मराठी शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे ऋण न फेडता येणारे आहे. उच्च शिक्षण घेवून अनेक विद्यार्थी मोठे होणार, परंतू आपल्या गावाशी व समाजाशी सामाजिक बांधिलकी ठेवण्याचे त्यांनी सांगितले. रावसाहेब पाटील शेळके यांनी नवनाथ विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. कोरोना काळात शाळा बंद होत्या, ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. स्पर्धामय जीवनात दहावी व बारावीला अधिक महत्त्व असून, हे जीवनाचे टर्निंग पाँइट आहे. विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयाच्या गुणवत्ता यादीतील प्रथम- स्वराली फलके (91.20 टक्के), द्वितीय- तृप्ती कापसे (91 टक्के), तृतीय- स्नेहल जाधव (90.80 टक्के), चौथी- आदिती शिंदे (89.40) पाचवी- निकीता कापसे, कार्तिक फलके (89.00) यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कांडेकर यांनी केले. आभार संदिप डोंगरे यांनी मानले.