अंगणवाडीत बसणार्या चिमुकल्यांचा जीवाचा प्रश्न ऐरणीवर
नवीन इमारत बांधण्याची ग्रामस्थांची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धोकादायक झालेल्या अंगणवाडीच्या इमारतीमुळे अंगणवाडीत बसणार्या चिमुकल्यांचा जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर इमारत त्वरीत बांधण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली असून, सदर मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी नगर तालुका पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुळे यांना दिले.
निमगाव वाघा, बाराखोंगळा वस्ती येथील अंगणवाडी क्रमांक 11 ची इमारत अत्यंत धोकादायक झाली असून, चारही बाजूने भिंतींना तडे गेलेले आहेत. तर भिंती देखील खचल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, लहान मुले अंगणवाडीत दररोज येतात. मोठा पाऊस झाल्यास मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी अंगणवाडीची धोकादायक झालेली इमारत पाडून ती त्वरीत बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर अंगणवाडी सेविका वैशाली फलके, मदतनीस भिमा भुसारे, भाऊसाहेब कदम, पोपट कदम, बाबासाहेब डोंगरे, महादेव जाधव, बापू जाधव, चंद्रकांत पवार, भाऊसाहेब ठाणगे, स्वप्निल डोंगरे, दादा डोंगरे, प्रमोद भुसारे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत.