सुचवलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पैश्याची मागणी केल्याचा जिल्हा परिषद सदस्या पवार यांचा आरोप
अहमदनगर(प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे समाजकल्याण विभागाचे सभापती यांनी जाणीवपूर्वक विकास कामात अडचणी निर्माण करून राखीव निधी वितरणाच्या निधीतून डावलल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद तथा समाज कल्याण समितीच्या मंगल अशोक पवार यांनी जिल्हा परिषदे समोर शुक्रवारी (दि.29 एप्रिल) उपोषण केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या संगिता गांगुर्डे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, जालिंदर वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा साळवे, सोनालीताई साबळे, मिनाताई शेंडे, संगिता दुसुंगे, लहूजी शक्ती सेनेचे भागचंद नवगिरे यांनी उपोषणात सहभागी होऊन पाठिंबा दिला.
श्रीरामपूर तालुक्यातील उंदरगाव गटातील अनुसूचित जमाती आरक्षित जागेतून जिल्हा परिषद सदस्या मंगल अशोक पवार निवडून आलेल्या आहेत. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या समिती सदस्य आहेत. समाजकल्याण समितीचे सभापती यांनी हुकूमशाही पद्धतीने व शासकीय नियमांची पायमल्ली करून 2021-22 या आर्थिक वर्षात समाज कल्याण योजनेचा निधी पासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या पवार यांनी केला आहे.
कामे होत नसल्याने लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनुसूचित जमातीच्या महिला जिल्हा परिषद सदस्याला डावलून झालेला अन्याय खेदजनक व असंविधानिक बाब आहे. गेल्या पाच वर्षापासून जिल्हा परिषदेचे समाजकल्याण विभागाचे सभापती यांनी मागासवर्गीय महिला सदस्यांना प्रशासकीय कामाची कमी माहिती असल्याने त्यांच्याशी गोड बोलून वेळोवेळी प्रोसिडिंगवर सह्या घेऊन फसवणूक केली आहे. दलित वस्ती योजनेचा 20 टक्के दिलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.