निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे नोंदवली हरकत
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-सोलापूर महामार्ग रस्त्यासाठी दहिगाव (ता. नगर) येथील सर्व धर्मिय भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जानपीर बाबा दर्गा हटविण्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्यांक विभागाने विरोध दर्शविला असून, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याकडे निवेदनाद्वारे हरकत नोंदविण्यात आली. यावेळी रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गुलामअली शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, अब्दुल अहमद, संतोष पाडळे, शरीफ सय्यद, आरिफ शेख, फैय्याज शेख, सोहेल शेख, बक्तावर शेख, सद्दाम शेख, इशान्त शेख, नईम शेख आदी उपस्थित होते.
नगर तालुक्यातील दहिगाव येथे जानपीर बाबा यांचे दोनशे वर्षापूर्वीची ऐतिहासिक दर्गा आहे. दर्गाच्या दर्शनासाठी सर्वच धर्मिय भाविक येत असतात. या ठिकाणी दरवर्षी मोठा उरूस साजरा करुन सदर ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. अनेक भाविकांच्या भावना या धार्मिक स्थळाशी जोडलेल्या आहेत. नगर-सोलापूर महामार्गाच्या रुंदीकरणात सदर दर्गा हटविण्याच्या हलचाली सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. ही दर्गा रस्त्याच्या कडेला असून, परिसरात रस्त्यासाठी मोठी स्वरूपाची जागा उपलब्ध आहे. काही समाजकंटक ही दर्गा हटविण्यासाठी प्रयत्नशील असून, यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखवून जातीय तणाव पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
प्रशासनाने सर्व भाविकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन जानपीर बाबांची दर्गा न हटविता नगर-सोलापूर रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी रिपाई अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. दर्गा हटविण्याचा प्रयत्न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.