जरुर करेंगे… या शब्दात लाहोटी यांचे शिष्टमंडळास आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांनी अहमदनगर रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु होण्यासाठी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी प्रवासी संघटनेचे अशोक कानाडे, वसंत लोढा, संदेश रपारिया, रेल्वे स्टेशन मॅनेजर एन.पी. तोमर, बाळासाहेब खताडे आदी उपस्थित होते. लाहोटी यांनी सदर रेल्वे जरुर करेंगे… या शब्दात शिष्टमंडळास आश्वासन दिले.
अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना मागील बारा वर्षांपासून रेल्वे सल्लागार समिती सदस्य हरजितसिंह वधवा यांच्या नेतृत्वाखाली नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या रेल्वेसाठी संघटना प्रयत्नशील असून, आवश्यक असणार्या सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये दौंड येथील कॉड लाईन, त्या ठिकाणी लागणारी तिकीट विक्री सुविधा यासाठी यशस्वी पाठपुरावा करण्यात आला. तर मनमाड-दौंडचे विद्युतीकरण अशा अनेक गोष्टीसाठी देखील संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीकोनाने जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु होण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना प्रयत्नशील असल्याचे रेल्वेचे महाप्रबंधक लाहोटी यांना स्पष्ट करण्यात आले. लाहोटी यांनी नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न लवकर सुटणार आहे. या प्रश्नाबाबत खासदार सुजय विखे पाटील यांनी श्याम जाजू यांच्या मार्फत रेल्वेमंत्री आश्विन कुमार वैष्णव यांना दिले आहे. मार्च महिन्यात रेल्वे मंत्री वैष्णव यांनी जाजू यांच्या मध्यस्थिने प्रवासी संघटनेला दिल्लीत चर्चेसाठी आमंत्रित केले असल्याची शिष्टमंडळाने लाहोटी यांना दिली.