निमगाव वाघात बसचे स्वागत
पाठपुराव्याला यश
अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी नुकतीच नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा पुर्ववत सुरु करण्यात आली असून, या बसचे निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वागत करण्यात आले.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी बसचे चालक आजीनाथ घुले व वाहक रावसाहेब रणशूर यांचा सत्कार केला. यावेळी माजी उपसरपंच बबन जाधव, भाऊसाहेब जाधव, गोरख चौरे, रामदास जाधव, बापू पुंड, मोहन जाधव, संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या टाळेबंदीनंतर नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा बंद करण्यात आली होती. यामुळे नेप्ती, मौजे निमगाव वाघा, पिंपळगाव वाघा, हिवरेबाजार, दैठणे गुंजाळ येथून शहरात शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी व विविध कामानिमित्त येणार्या नागरिकांची गैरसोय होत होती. ही बस सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी निमगाव वाघा ग्रामपंचायत कार्यालयच्या वतीने काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेऊन एस.टी. महामंडळाने सदरची बस सेवा सुरु केली आहे. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने एसटी महामंडळाचे आभार मानण्यात आले.