• Wed. Dec 11th, 2024

नगर-कल्याण महामार्गाच्या कामात झालेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी

ByMirror

Jun 20, 2022

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

साईड पट्टयांचे कामे झाली नसल्याने महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण महामार्गाच्या कामात साखळी पध्दतीने झालेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी व अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सदर महामार्गावरील दुतर्फा मुरूम फिलिंग करुन रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, डॉ. अभिजीत रोहोकले, जिल्हा संघटक भानुदास साळवे, पारनेर तालुकाध्यक्ष उमेश गायकवाड, प्रकाश थोरात, रावसाहेब थोरात, भगवान भालेकर, महिला जिल्हाध्यक्षा सारिका लांडगे, शोभा कांबळे, हरिश साळवे, सुनिल गाडगे, मारुती शिंदे आदी सहभागी झाले होते.
भाळवणी (ता. पारनेर) येथे सन 2014 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नगर-कल्याण महामार्गाचे उद्घाटन झाले होते. 2014 नंतर आज पर्यंत प्रोजेक्ट डायरेक्टरने ढुंकूनही पाहिले नाही. जितेंद्रसिंग ग्रुप व ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (राजुरी) यांनी संगनमताने व साखळी पद्धतीने या कामात कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचा असून या महामार्गासाठी केंद्र सरकारचा किती निधी आला व कसा खर्च झाला? याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होण्याची गरज आहे. सन 2014 नंतर नगर-कल्याण महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. हायवेच्या दुतर्फा मुरूम फिलिंग न केल्याने अपघाताने अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे. या प्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधूनही फक्त आश्‍वासने आणि उडवाउडवीची खोटे आश्‍वासन देऊन वेळकाढूपणा केला जात आहे. ध्रुवचे अधिकारी यांनी महामार्गाच्या दुतर्फा बाजूने सरकारी नियम धाब्यावर बसवून पेट्रोल पंम्प, धाबे, हॉटेल, परमिटरूमच्या ना हरकत दाखल्यांसाठी लाखो रुपये घेऊन परवानग्या देण्यात आलेल्या आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या अतिक्रमणाकडू दुर्लक्ष केले जात आहे. सदरची अतिक्रमणे व चुकीच्या पध्दतीने व्यवसायासाठी देण्यात आलेले ना हरकत दाखल्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

नगर-कल्याण महामार्गावर वारंवार अपघातामध्ये अनेकांचा जीव जात असून, सदर अधिकारी व ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, महामार्गाच्या दुतर्फा बाजूने सरकारी नियम धाब्यावर बसवून देण्यात आलेल्या ना हरकत परवानगीची चौकशी व्हावी, महामार्गावरील अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावी, मौजे भाळवणी बायपास येथील कापरी चौकात त्वरित हायमॅक्स बसवण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

नगर-कल्याण महामार्ग मृत्यूचा सापळा झाला असून, अनेकांचा जीव जात आहे. याकडे दुर्लक्ष करुन अधिकारी ठेकेदार कोट्यावधी रुपयांचा अपहार केलेला आहे. हायवेच्या दुतर्फा मुरूम फिलिंग न केल्याने अपघात घडत असून, जो पर्यंत रस्त्याच्या साईड पट्टयांचे काम व इतर दुरुस्ती होत नाही, तो पर्यंत ढोकी येथील टोलनाक्याची वसुली थांबविण्यात यावी. जनहिताच्या या मागणीवर कार्यवाही न झाल्यास औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार. – रघुनाथ आंबेडकर (पश्‍चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *