मेडिक्वीन मेडिको पेजंट मिसेस महाराष्ट्र स्पर्धा
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील डॉक्टर अमृता बर्हाटे यांनी नुकतेच झालेल्या मेडिक्वीन मेडिको पेजंट मिसेस महाराष्ट्र 2022 मध्ये मिसेस मेडिक्वीन महाराष्ट्र स्मार्ट अॅण्ड ब्युटीफुल हा किताब पटकाविला. पुण्यातील बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.
मेडिक्वीन मेडिको पेजंट तर्फे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. मेडिक्वीन ही केवळ एक सौंदर्य स्पर्धा नसून, महिला डॉक्टरांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणून पुढे आले आहे. डॉ. अमृता बर्हाटे यांना सुनेत्राताई पवार, शितल रांका, अभिनेत्री पूजा सावंत, सुशांत शेलार, डॉ. ऊत्कर्ष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे हे तिसरे पर्व होते. महाराष्ट्रातील अॅलोपॅथी, आयुर्वेद, डेंटल, होमिओपॅथी, फिजिओथेरपी क्षेत्रातील दोनशे पेक्षा जास्त महिला डॉक्टर सहभागी झाल्या होत्या. त्यातून 55 स्पर्धक शेवटच्या फेरीमध्ये पोहोचले. यामधून विविध कॅटगरीतून विजेते ठरविण्यात आले. अभिनेते समीर धर्माधिकारी, शितल रांका, डॉ. रेवती राणे, डॉ. ऊज्वला बर्दापूरकर, डॉ. श्रद्धा जावंजल, डॉ. अमोल गिते यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले. डॉ. बर्हाटे यांनी मिळवलेल्या यशबाद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.