सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.21 मे रोजी या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून, 29 मे पर्यंत तब्बल नऊ दिवस फुटबॉलचा थरार रंगणार आहे. यामध्ये 8 संघांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती उद्योजक तथा अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व शिवाजीयन्सचे अध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी दिली. यावेळी फुटबॉल संघटनेचे सचिव गॉडविन डिक, खजिनदार रिशपालसिंह परमार उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटना (एडीएफए) चे माजी सचिव अलेक्स फर्नांडिस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरीप्रमाणे खेळविण्यात येणार आहे. 8 संघ 2 गटात विभागले गेले असून, दिवसात दोन सामने होणार आहे. गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. विजेत्या संघास चषक 7 हजार रु. तसेच उपविजेत्या संघाला चषक आणि 5 हजार रु. चे पारितोषिक देण्यात येणार आहे. यासह संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, मध्यरक्षक, स्ट्राईकर आणि उद्योन्मुख खेळाडू यांची निवड करुन त्यांना देखील बक्षिसे दिली जाणार आहेत.
पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर फिरोदिया शिवाजीयन्स विरुद्ध जेएफसी तर आंबेडकर एफसी विरुध्द युनिटी एफसी यांच्यात होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विक्टर जोसेफ, जॉय जोसेफ, पल्लवी सैंदाणे, सचिन पात्रे, जेव्हिअर स्वामी, उपेंद्र गोलांडे, रुनक फर्नांडिस आदी परिश्रम घेत आहे.