विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी, प्रोफेसर चौकात प्रोफेसर चौक चौपाटी असोसिएशन व अहमदनगर योगा सेंटरच्या वतीने आमदार अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मर्दानी खेळ कार्यक्रमांतर्गत रोप मल्लखांब, पोल मल्लखांब व एरियल सिल्कचे धाडसी प्रात्यक्षिके दाखविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी नगरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
अत्यंत अवघड असलेली प्रात्यक्षिके सहजपणे सर्व वयोगटातील मुले-मुली सादर करत होती. हे पाहण्यासाठी प्रोफेसर चौक चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी आमदार संग्राम जगताप, प्रोफेसर चौक चौपाटी असोसिएशनचे संदिप जाधव, गणेश तुरे, अविनाश धाडगे, बबलू भिंगारे, गणेश साळे, रोहन थापा, निलेश मिसाळ, राजू पवार, दिनेश तेली, नवीन बोहोत, अतिष मट्टू, धीरज वाधवा, विजय भाटिया, आकाश कुलथे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, प्रोफेसर चौक चौपाटी असोसिएशन संघटना हे आपले व्यवसाय करून सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देत आहे. त्यांचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असून, संघटनेच्यावतीने कोरोनाच्या संकटात मोठ्या प्रमाणात नागरिकांना मदत करण्यात आली होती. तसेच संघटनेचा नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये मोलचा वाटा असतो. या मल्लखांबचा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.