चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी होणार ईद साजरी
अहमदनगर(प्रतिनिधी)- रमजानचा पवित्र महिना संपत असताना सोमवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी (दि.3 मे) मुस्लिम बांधव उत्साहात रमजान ईद साजरी करणार आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्ष मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानमध्ये ईदची सामुदायिक नमाज अदा केली नव्हती. यावर्षी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव ईदगाह मैदान मध्ये येणार असल्याने ईदगाह मैदान येथे नमाजची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
रमजान ईदची नमाज सकाळी 10 वाजता कोठला येथील ईदगाह मैदान मध्ये होणार आहे. मैदानात जागा अपूरी पडल्यानंत ररस्त्यावरही नमाज पठण करण्यात येत असते. यासाठी नगर- औरंगाबाद महामार्गावरील वाहतुक पोलीस प्रशासनाने वळविण्यात आल्याचे आदेश जारी केले आहे. तसेच काही दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदान परिसराची स्वच्छता देखील करण्यात आलेली आहे.
ईदची नमाज शहरे खतीब मौलाना अहमद सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. प्रारंभी धार्मिक व्याख्यान, ईदची नमाज, खुदबा व त्यानंतर सुख, शांती, समृध्दी आणि सामाजिक शांततेसाठी प्रार्थना केली जाणार आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.