राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या
जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनात एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नावर विचारमंथन
अहमदनगर (प्रतिनिधी)- आंदोलनातून संघटनेची शक्ती दिसत असते. देश पातळीवर बामसेफ ने आंदोलने करुन देशात एनआरसी कायदा लागू करण्यास निघालेल्या केंद्रातील भाजप सरकारचा मनसुबा हाणून पाडला. जनता जागृक होऊन या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरली. देशात मुस्लिम विरोधी भासविण्यात येणारे सर्व अभियान प्रामुख्याने एससी, एसटी, ओबीसी विरोधात असल्याचे प्रतिपादन बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले.
राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष आणि महानायक, महानायिका संयुक्त जयंती निमित्त शहरातील टळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात मार्गदर्शन करताना अध्यक्षीय भाषणात मेश्राम बोलत होते. यावेळी उद्योजक जितेंद्र तोरणे, राजीव खांडेकर, जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना मुफ्ती मोहम्मद इर्शादुल्लाह, प्रा. गोरखनाथ वेताळ, डॉ. मगन ससाणे, सुनिल जाधव, ज्ञानदेव खराडे, डॉ. अतुल मोरे, बबनराव गुंजाळ, योगी सुरजनाथजी, अमोल लोंढे, रवींद्र राऊत, उत्तरेश्वर मोहोळकर, प्रा डॉ.पी.के. चौदंते, प्रकाश कांदळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलताना मेश्राम म्हणाले की, देशात मुस्लिम विरोधी घेतले जाणारे निर्णय 25 टक्के त्यांच्या विरोधात तर 75 टक्के मागासवर्गीय व अल्पसंख्यांक विरोधात आहेत. हे राजनीतीचे षडयंत्र लक्षात घेऊन, सर्व मागासवर्गीय अल्पसंख्यांक समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. भारत बंद संविधानानुसार आंदोलन करण्याचा एक अधिकार आहे. संघटनेचा प्रत्येक पातळीवर संघर्ष सुरू आहे. हा लढा सातत्याने सुरु राहिल्यास भविष्यात दहा वर्षानंतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजाला देशाचे नेतृत्व मिळू शकणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर शहरापेक्षा गावागावात जावून ग्रामीण भागातील जनेतेला जागृक करुन संघटनेशी जोडण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकात डॉ. भास्कर रणनवरे यांनी बहुजनांना गुलामगिरीची जाणीव करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे. बहुजन मूलनिवासी गुलामगिरीत खितपत पडले असून, जन आंदोलनातून वंचित वर्गांसाठीचा लढा यशस्वी होणार आहे. बहुजन समाज एकवटल्यास त्यांना नेतृत्व देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत रितेश पगारे यांनी केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठ नागरिकांनी लोक वर्गणीतून जमा केलेला जनआंदोलन निधी मेश्राम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
प्रा. गोरखनाथ वेताळ म्हणाले की, ओबीसींची लोकसंख्या देशात मोठी आहे. मात्र त्यांना त्यांचे हक्क द्यावे लागतील या भितीने त्यांची जातीनिहाय जनगणना केली जात नाही. देशातील मोजक्या भांडवलदारांची प्रगती सोडली, तर देशाची प्रगती झालेली नसून, बहुजन समाज हे प्रामुख्याने दुर्लक्षीत राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मगन ससाणे यांनी सर्व एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक एकत्र येत नाही, तोपर्यंत देशातील मूलनिवासी बहुजनांच्या समस्या सुटणार नसल्याचे सांगितले.
बबनराव गुंजाळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण नसल्याने या समाजाची पिछेहाट झाली. समाजातील मोठा वर्ग वंचित राहिलेला आहे. मोर्चे काढूनही समाजाचा प्रश्न सुटलेला नसून, सर्व जातीय समूहाने एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिल्यास तो संघर्ष यशस्वी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मकासरे यांनी केले. शिवाजी भोसले यांनी उपस्थित पाहुणे व बहुजन समाजातील नागरिकांचे आभार मानले. या प्रबोधन संमेलनासाठी जिल्ह्यातील एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलन यशस्वी करण्यासाठी रमेश सोनवणे, आर.एम. धनवडे, गणेश चव्हाण, डॉ. अनिल ससाणे, डॉ. रमेश गायकवाड, दीपक तपासे, प्रकाश लोंढे, संजय संसारे, अतुल आखाडे, नवनाथ शिंदे, संभाजी गदादे, रतिलाल क्षेत्रे, गणपत मोरे आदींनी परिश्रम घेतले.