राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात झालेल्या दलित मुलाच्या अमानवी हत्येचा निषेध
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात दलितांवर होणार्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निदर्शने करण्यात आली. नुकतेच राजस्थान मधील जालोर जिल्ह्यात लहान मुलाची झालेल्या अमानवी हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, गुलाम शेख, संतोष पाडळे, ज्योती पवार, अलका बोर्डे, संपदा म्हस्के, पुजा साठे, संदीप वाघचौरे, निजाम शेख, जमीर इनामदार, बंटी बागवान, इमरान शेख, हुसेन चौधरी, मोहसीन शेख, विनीत पाडळे, जावेद सय्यद, नईम शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राजस्थान मधील जालोर जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नऊ वर्षीय मागासवर्गीय कुटुंबातील इंद्रपाल या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकाच्या माठेतून एक ग्लास पाणी पिल्याने, त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही मागासवर्गीय समाज बहिष्कृतच आहे. एका बालकाचा जातीयवादी प्रवृत्तीतून बळी गेला असून, ही निंदनीय बाब असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
आजही मागासवर्गीय समाजाला वाईट वागणुक मिळत असून, त्यांच्याकडे शुद्र भावनेने पाहिले जात आहे. मुलाचा बळी जाऊनही पोलीस प्रशासन पीडित कुटुंबाला धमकावत होते. याला स्वातंत्र्य म्हणायचे का? हा प्रश्न रिपाईच्या वतीने उपस्थित करुन मागासवर्गीयांना देशात गुलामासारखी वागणुक मिळत आहे. अशाच प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत असून, आरोपींना पाठिशी घालण्याचे प्रकार घडत आहे. मागासवर्गीयांना न्याय, हक्कासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजावर अन्याय, अत्याचार झाल्यास तात्काळ गुन्हे दाखल करुन आरोपींना अटक व्हावी, राजस्थान मधील जालोर जिल्ह्यात लहान मुलास अमानवी पध्दतीने मारहाण करणार्या छैलसिंह या शिक्षकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.