खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर नोंदविला निषेध
अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणाच्या विरोधात सुरु असलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर संपाच्या दुसर्या दिवशी मंगळवारी (दि.29 मार्च) राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अहमदनगर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर खाजगीकरणाचा निषेध व्यक्त करुन संपास पाठिंबा दर्शविण्यात आला. यावेळी संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर, विजय काकडे, पोपट कोळकर, भाऊसाहेब डमाळे, ज्ञानेश्वर कांबळे, गणेश कोळकर, महादेव शिंदे, संदीप बनसोडे, प्रदीप चव्हाण, भगवान सानप आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणाच्या विरोधात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशातील 11 कामगार संघटना उतरल्या आहेत. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने 28 व 29 मार्च रोजीच्या दोन दिवस देशव्यापी संपाची हाक दिली असून, यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना देखील सहभागी झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाने दिलेला शब्द पाळला नसल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी बंधू-भगिनी यांनी शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती लावल्या होत्या. संपाच्या दुसर्या दिवशी प्रत्येक कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.