दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात आली स्पर्धा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात घेण्यात आलेल्या दिव्यांग सप्तरंग रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सप्तरंग प्रिंट वर्ल्ड व महानगरपालिका शिक्षण विभाग समावेशित शिक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने रिमांड होम केंद्र शहरस्तरीय ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
महर्षी ग.ज. विद्या मंदिर येथे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भाऊसाहेब थोरात, पर्यवेक्षक जुबेर पठाण, सप्तरंगचे नंदेश शिंदे, समन्वयक समावेशित शिक्षण केंद्राचे विशेष शिक्षक उमेश शिंदे, लेखक सुदर्शन बोगा, महेश क्षीरसागर, मुख्याध्यापक दशरथ पाटील, आबासाहेब शिंदे, आढाव सतीश, प्रभाकर थोरात आदी उपस्थित होते.
महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भाऊसाहेब थोरात व पर्यवेक्षक जुबेर पठाण यांनी स्पर्धेत उतरलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नंदेश शिंदे यांनी दिव्यांगाच्या शिक्षणाकडे पाहताना विचारांची दिशा बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. विशेष शिक्षक उमेश शिंदे गेल्या दहा वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने त्यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या भावनिक विकास, संवेदना, एकाग्रता, हस्त, नेत्र कौशल्याचा विकास होण्यास मदत झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व शैक्षणिक साहित्य बक्षिस म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले. आभार सतीश आढाव यांनी मानले.