• Thu. Dec 12th, 2024

दहशतीने मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावणार्‍या गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखला व्हावा

ByMirror

May 28, 2022

रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावण्यासाठी दहशत पसरवून सदर कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणार्‍या कोल्हार (ता. पाथर्डी) मधील गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, विजय शिरसाठ, सुयोग बनसोडे, संतोष पाडळे, ज्योती पवार, सार्थक भिंगारदिवे, पिडीत कुटुंबीय बाळू वाकडे, सचिन वाकडे, रावसाहेब वाकडे आदी उपस्थित होते.
बाळू वाकडे व सुनीता वाकडे या दांम्पत्यांची कोल्हार (ता. पाथर्डी) येथे वडिलोपार्जीत जमीन आहे. या जमिनीचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यापैकी काही शेत जमीन खरेदी केल्याचे गावातील एका गुंडाचे म्हणने आहे. ही जमीन वाकडे यांच्या ताब्यात असून, ती जमीन बळकावण्यासाठी सदर गुंड वाकळे कुटुंबीयांना सातत्याने भोंगळी धिंड काढण्याबाबत धमकावून जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत आहे. सदर गावगुंडाचे गावात बरेच अवैध धंदे असून, गावात त्याची दहशत आहे. त्याने अनेक गोरगरिबांवर अत्याचार केला असून, त्याच्या दहशतीमुळे कोणी त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


बाळू वाकडे यांनी या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज दिला होता. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. सदर मागासवर्गीय दांम्पत्यांना गावगुंड व्यक्तीकडून जीवितास धोका निर्माण झाला असून, त्यांना जीव मुठीत धरुन राहण्याची वेळ आली आहे. मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावण्यासाठी दहशत पसरवून सदर कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणार्‍या गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईचे वतीने करण्यात आली आहे. संबंधित गुंडावर कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *