महापालिकेकडून फक्त आश्वासनांची खैरात
वैतागलेल्या नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या केडगाव हद्दीत अरणगाव रस्त्यावरील शितल हॉटेलच्यामागे असलेल्या जय गणेश कॉलनीत गेल्या तब्बल 3 वर्षापासून महापालिकेकडून पथदिव्यांचा प्रकाशच पडलेला नाही. त्यामुळे रात्री अपरात्री नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्याने या कॉलनीत नुकतेच खांबावर एलईडी लटकविण्यात आले आले, मात्र तेदेखील बंदच आहे. ग्रामीण भागातील डिपीवर महावितरण कनेक्शन जोडू देत नसल्याने व महापालिका प्रशासन त्याबाबत पर्यायी व्यवस्था करत शे- सव्वाशे घरे असलेली ही कॉलनी मात्र अंधारातच राहिली आहे.
दरम्यान जय गणेश कॉलनीतील दिव्याखालच्या अंधाराला या भागातील जनता चांगलीच वैतागली असून, तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यावेळी भाऊसाहेब देशमुख, मच्छिंद्र वाव्हळ, अमोद नलगे, टी.एम. वाघमारे, निवृत्ती घोडके, रामदास वाल्हेकर, सुभाष ठुबे, जयवंत पिंपळे, सागर काळे, राहुल कांकरिया, आकाश ठोंबरे, योगेंद्र कासार, अरुणा नलगे, संगीता नलगे, मंगल काळे, संजीवनी देशमुख, लता वाघमारे, छाया ठुबे, प्रतिभा कासार, डॉ. पानसरे, मनीषा गायकवाड, सोनाली गोरे, अरविंद घोडके, भरत गोरे, शेख, परदेशी, नरेंद्र दातीर आदी नागरिक व महिला उपस्थित होत्या.
सदर जय गणेश कॉलनीमध्ये शंभर ते सव्वाशे घरांची लोकवस्ती असून, महापालिका हद्दीच्या सिमेवर ही कॉलनी आहे. ओढ्याच्या पूर्वीकडील बाजू बुरुडगावमध्ये जाते तर पश्चिमेकडील बाजू केडगाव हद्दीत येते. या भागात असलेली डिपी ग्रामीणची असल्याने महावितरण महापालिकेला पथदिव्यांसाठी कनेक्शन जोडू देत नाही. महापालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवकही नागरिकांच्या या अनेक वर्षांच्या रखडलेल्या प्रश्नाकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने हा प्रश्न तसाच प्रलंबीत राहिला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर जाण्यासाठी स्वतःची लाईट जाळून उजेड करावा लागतो.
तर रात्री अपरात्री काही कामानिमित्ताने हातात टॉर्च घेऊनच महिला व नागरिकांना जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागत आहे. पथदिवे नसल्याने या भागात रात्रीच्यावेळी पूर्णत: अंधार असल्याने घरफोडी, चोर्या, लुटमारीचे अनेक प्रकार घडत आहे. यामुळे महिलांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेचे सर्व कर भरुनदेखील मूलभूत सुविधा मिळत नसल्याने याबाबत नागरिकांनी आयुक्तांकडे सातत्याने संपर्क साधून पत्रव्यवहार केला, मात्र कार्यवाही काहीच होत नाही. नागरिकांना फक्त आश्वासनांची खैरात मिळत आहे.
ग्रामीण भागासाठी याच कॉलनीतून जास्त विद्युत दाबाच्या तारा गेलेल्या असून, त्याच जुन्या खांबावर महापालिका हद्दीतील विद्युत तारा काही फुटाच्या अंतरावर आहेत. या लोंबकळणार्या तारा नागरिकांच्या जीवितास धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात या तारांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासन व नगरसेवकांनी याबाबत तातडीने लक्ष घालावे आणि कॉलनीतील पथदिव्यांचां 3 वर्षांपासून रखडलेला प्रश्न तात्काळ सोडवावा, लोंबकळणार्या तारा व्यवस्थित करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.