मुस्लिम बांधवांना हातात हात देऊन येणार्या रमजान ईदच्या हिंदू बांधवांनी दिल्या शुभेच्छा
अहमदनगर(प्रतिनिधी)- तपोवन रोड, सुर्यानगर भागात मशिदीसमोर सर्व धर्मियांनी एकत्र येत रोजा इफ्तार कार्यक्रमात सहभाग घेतला. मुस्लिम बांधवांना हातात हात देऊन येणार्या रमजान ईदच्या उपस्थित हिंदू बांधवांनी शुभेच्छा दिल्या. बिलाल मस्जिद, तोफखाना पोलीस स्टेशन व शरद पवार विचार मंचच्या वतीने रमजानच्या पार्श्वभूमीवर रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
इफ्तार कार्यक्रमासाठी शहराचे विभागीय पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पीएसआय समाधान सोळंकी, सहा.पो.नि. मुजावर, शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद, नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, निखील वारे, बाळासाहेब पवार, सुनिल त्रिंबके, तिवारी महाराज, राहुल सांगळे, प्रताप गायकवाड, प्रसाद दरंदले, झेंडे, गोपी शेख, राजू सय्यद, साजिद शेख आदींसह परिसरातील सर्व धर्मिय नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात सय्यद नूर यांनी सर्व धर्मात प्रेम, शांतता व माणुसकीचा संदेश देण्यात आलेला आहे. जो माणुसकी सोडून धर्माचा संदेश देतो, तो धर्म नसून धर्मांधता आहे. विविधते मध्ये असलेली एकता हे देशाचे वैभव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निखील वारे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व जाती-धर्मातील स्वातंत्र्य वीरांनी योगदान दिले. या लढ्यात योगदान न दिलेले लोक आज समाजाला जाती-धर्माच्या नावाने वेगेळ्या मार्गाने घेऊन जात आहे. आपल्या भागातील सामाजिक शांतता ठेवणे त्या भागातील नागरिकांची जबाबदारी असून, यासाठी मोहल्ला कमिटी गठित करण्याचे त्यांनी सुचवले.
अनिल कातकडे म्हणाले की, कोरोना काळात माणुसकी जिवंत राहिली. सध्या कोरोना संपल्यावर जातीय द्वेष पसरविणार्यांना जात-धर्म आठवू लागला आहे. कोरोना काळाप्रमाणे माणुस म्हणून जगण्याची गरज आहे. एकोपा निर्माण झाल्यास मुठभर समाजकंटकांना रोखता येणार आहे. युवकांनी चुकीच्या गोष्टीत पडू नये, पोलीस तपास यंत्रणा शेवटच्या गुन्हेगारा पर्यंत जाऊन त्याला जेरबंद करण्याचे काम करत आहे. युवकांनी आपल्या भवितव्य खराब न करता अधिकारी होऊन समाजाची सेवा करण्याचे त्यांनी सांगितले.
पीएसआय समाधान सोळंकी म्हणाले की, युवकांनी समाज विघातक प्रवृत्तीला बळी न पडता, आपले कर्तव्य पार पाडावे. माथी भडकविणार्यांना आपल्या समाजात शांतता ठेऊन उत्तर देण्याची गरज असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी आजच्या युगात मोबाईल हे बॉम्बप्रमाणे अत्यंत स्फोटक बनले आहे. सोशल मिडीयातील चुकीच्या गोष्टींना थारा न देता, सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. पालकांनी देखील आपला मुलगा कोणत्या विचारधारेत वावर आहे? याकडे लक्ष देण्याचे त्यांनी आवाहन केले. तिवारी महाराज यांनी सर्व धर्मापेक्षा माणुसकी हा धर्म श्रेष्ठ असून, माणुसकीच्या भावनेने प्रत्येकाने समाजात योगदान देण्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी अन्वर खान यांनी केले. आभार अब्दुल रऊफ यांनी मानले.