जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम
बालकांच्या सुरक्षिततेसाठी व भवितव्याचा विचार पोस्को कायद्याची निर्मिती -न्यायाधीश भाग्यश्री पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी)- बालहक्क संरक्षण कायद्याचे इंग्रजीतील संक्षिप्त रूप म्हणजे पॉक्सो कायदा असून, लैंगिक अत्याचारांपासून 18 वर्षांखालील मुला-मुलींचे संरक्षण करण्याच्या हेतूने 2012 मध्ये हा कायदा असतित्वात आला. जगातील सर्वांत जास्त बालके (18 वर्षे वयाखालील) भारतात राहतात. त्यांना संरक्षण देण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली असून, बालकांच्या सुरक्षिततेसाठी व भवितव्याचा विचार करुन या कायद्याची निर्मिती झाली आहे. बालकांनी स्वत:वर झालेला अत्याचार न लपविता निसंकोचपणे आपले आई-वडिल व शिक्षकांना सांगण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.
तक्षिला स्कूलमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने बालक संरक्षण (पोस्को) कायद्याच्या जनजागृतीसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश पाटील बोलत होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना स्वत:वरील झालेला अन्यायाचा बिमोड करण्यासाठी मार्गदर्शन करुन, पोस्को कायद्याची माहिती देण्यात आली.
पुढे न्यायाधीश पाटील म्हणाल्या की, या कायद्यानुसार किमान शिक्षा दहा वर्षे तर कमाल जन्मठेपेची (प्रसंगी फाशी) तरतूद करण्यात आली आहे .या कायद्यात जामीन मिळणेही मुश्किल आहे. शिवाय जलदगती न्यायालयात खटला चालविला जात असल्यामुळे आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा होते. पीडित असलेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा खूप विचार करुन त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने अहवाल देणे, पुराव्याची नोंद करणे आणि खास नेमण्यात आलेल्या विशेष न्यायालयांच्या मार्फत जलद गतीने चालविण्यात येणार्या खटल्याची त्यांनी माहिती दिली.
अॅड. अभय राजे यांनी सर्वोच्च न्यायालयाने पोस्को संदर्भात शाळांना सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती दिली. तर विद्यार्थ्यांना शहरात मोठ्या प्रमाणात होणारे लहान-मोठे अपघात यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन केले. स्कुलच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारिक व सामाजिक ज्ञान देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. या मार्गदर्शनवर झालेल्या व्याख्यानात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे साडेतीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक तन्वीर खान व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.