• Mon. Dec 9th, 2024

डोनेट फर्स्ट व समीक्षा ग्रुपने महिलांमध्ये केली कॅन्सरची जागृती

ByMirror

Sep 8, 2022

आरोग्यावर बोलू काही! व्याख्यानास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

जीवनात आरोग्यम धनसंपदा महत्त्वाची -अजयजी बलई

अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात आरोग्यम धनसंपदा महत्त्वाची, मात्र धनसंपदेकडे सर्व धावू लागल्याने आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले. पुढच्या पिढीच्या धनसंचयासाठी सध्याची पिढी धडपड करुन विविध आजारांना बळी पडत आहे. पुढच्या पिढीला धनदौलत नव्हे, तर सदृढ आरोग्य देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अजयजी बलई यांनी केले.


शहरातील डोनेट फर्स्ट ग्रुप आणि पुणे येथील समीक्षा ग्रुपच्या वतीने महिलांसाठी कॅन्सरवर जनजागृतीवर आरोग्यावर बोलू काही! व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बडीसाजन मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात बलई बोलत होते.
पुढे बलई म्हणाले की, लाईफस्टाइल बिघडल्याने मनुष्य अनेक आजारांना बळी पडत आहे. मशीनने सर्वांचे आयुष्य व्यापले असून, अंगमेहनत कमी झाल्याने अनेक व्याधी सुरु झाल्या आहेत. मनुष्याच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास तेवढाच महत्त्वाचा असल्याचे सांगून आहार व व्यायामाकडे लक्ष देण्याचे त्यांनी आवाहन केले.


प्रास्ताविकात तृप्ती देसरडा यांनी डोनेट फर्स्टच्या माध्यमातून शहरातील गरजू घटकातील परिवारांना मदत देण्याचे कार्य सुरु आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक तर रुग्णांना वैद्यकिय मदत दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अनंत रंजन, उमा तटके आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


डॉ. ऋची शहा म्हणाल्या की, कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना महिलांची लाईफस्टाईल बदलली आहे. स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास तिच्याकडे वेळ नाही. कॅन्सरचे निदान झाल्यावर योग्यवेळी योग्य उपचार झाल्यास कॅन्सरवर मात करता येऊ शकते. कॅन्सरची चाहूल ही शरीरात कोणत्याही भागात अचानकपणे आलेली गाठ, विशेषत: स्तनात व मानेमध्ये आलेली गाठ, हळूहळू वाढणारी औषधाने बरी न होणारी जखम किंवा कातडी, ओठ, तोंड व जीभ इत्यादी ठिकाणी झालेली जखम, औषधाला दाद न देणारा खोकला किंवा घशात घोगरा आवाज, अगर आवाजात पडलेला फरक या गोष्टींमुळे प्राथमिक अवस्थेत कॅन्सर ओळखता येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. अनिता घुमे म्हणाल्या की, कॅन्सर म्हणजे मृत्यू ही समाजातील भिती दूर होण्याची गरज आहे. विज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती झाली असून, अद्यावत औषधी व उपचार पध्दतीने कॅन्सरपासून रुग्ण वाचू शकतो. कॅन्सरने आयुष्य संपत नसून, त्याला धैर्याने तोंड देण्याचे त्यांनी सांगितले. प्रिया कोठारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल शेटीया व डोनेट फर्स्टच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *