गुट्टलबाज सत्तापेंढारीमुळे जातीचे प्राबल्य वाढल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील मनुशोषित व भ्रष्ट शासन पद्धती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोडित काढली. त्यांनी केलेले कार्य पुढे चालविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंती दिनी हुतात्मा स्मारकात महाडिच्चू कावा गॅझेट प्रसिध्द केले जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
स्त्रीदास्य व जातीदास्याला कारणीभूत असलेली अडीच हजार वर्षाची मनुशोषित व भ्रष्ट शासन पद्धती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डिच्चू काव्याने मोडित काढली. शोषित तसेच आर्थिक, सामाजिक, राजकीय न्यायापासून वंचित राहिलेल्या समाजाला पहिल्यांदा मुक्तीचा श्वास घेता आला. मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जातीवाहक व लाचवाहक गुट्टलबाज सत्तापेंढारीमुळे जातीचे प्राबल्य वाढले आहे. समाजात जातीच्या नावाने विषमता पेरुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार केला जात आहे. बाबासाहेबांनी जातीय अंताच्या लढाईसाठी दिलेला लढा पुढे चालविण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या विचाराने संघर्ष करण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतल असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केला. भारतीय संविधानाच्या माध्यमातून मनुशोषित शासन पध्दती मोडीत काढून जनतेला ऑपरेशन पर्याय त्यांनी उपलब्ध करुन दिला. या ऑपरेशन पर्यायाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना जातीमंडूक व सत्तापेंढारी यांना धडा शिकवता येणार आहे. यासाठी डिच्चू कावा तंत्राचा स्विकार करुन बाबासाहेबांच्या विचाराने क्रांती घडविण्याची गरज असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. महाडिच्चू कावा गॅझेट प्रसिध्द करण्यासाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.