पुतळ्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास समितीच्या वतीने शहर बंदची हाक
अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवून पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी महापालिकेत शुक्रवारी (दि.25 फेब्रुवारी) आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाचे बैठक पार पडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकरी विचारांना मानणारे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने बैठा सत्याग्रह करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेत बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत आयुक्त शंकर गोरे, महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर यशवंत डांगे, शहर अभियंता सुरेश इथापे, महिला बालकल्याण समितीचे सभापती पुष्पाताई बोरुडे आदीसह नगरसेवक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास संघर्ष समितीच्या वतीने शहर बंदची हाक देखील देण्यात आली आहे. संघर्ष समितीच्या वतीने पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी विविध सूचना मांडण्यात आल्या.
बैठकित काय झाला निर्णय?
मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेल्या परिसराच्या जागेची मोजणी करण्यात येणार आहे. आर्किटेक नेमून डिझाईन तयार केली जाणार आहे. ती डिझाईन पालिकेत उपलब्ध करण्यात येणार आहे. 3 मार्चला न्यायालयीन प्रक्रियेची सुनावणी झाल्यावर पुर्णाकृती पुतळ्यासंदर्भात पुढील कार्यवाही केली जाणार आहे.