हस्ताक्षर सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल शाळेतील पुर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी प्री ग्रॅज्युएट सोहळा साजरा करण्यात आला. पदवीदान समारंभाप्रमाणे शैक्षणिक वर्षाचे निकाल देऊन पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कोरोनामुळे मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळा 1 मे पर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. त्यात मुलांचे गणित, इंग्रजी, मराठी, हिंदी या विषयावर अधिकचे तास घेण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून मुलांना लिहण्याची सवय राहिली नसल्याने विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधारणा विशेष कार्यशाळा घेण्यात आली असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य आनंद कटारिया यांनी दिली.
अशोक सप्तर्षी यांनी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी हस्ताक्षर सुधारण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने हस्ताक्षराचे धडे दिले. त्यांनी कोरोनामुळे दोन वर्ष शाळेस खंड पडल्याने विद्यार्थ्यांना लिहिण्याची सवय राहिली नव्हती. त्यांचे हस्ताक्षर सुधारावे यासाठी विद्यार्थ्यांना अक्षरलेखनाचे मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे सांगितले. निकिता कटारिया यांनी शाळेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. पूर्व प्राथमिक मधून प्राथमिक वर्गात जात असताना शैक्षणिक क्षेत्रातील पहिला टप्प पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभाप्रमाणे निकाल देण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम भंडारी यांनी केले. आभार योगिता पाठक व अनुपमा तोडमल यांनी केले.