वेतन पथक अधीक्षकांचे आश्वासन
सर्व प्रकारची पुरवणी देयके अदा करण्याचे शिक्षक संघटनांची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे वैद्यकीय बिले, सर्व प्रकारची पुरवणी देयके व प्रलंबित शालार्थ आयडी मिळण्याच्या मागणीचे निवेदन शिक्षक संघटनांच्या वतीने माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक अधीक्षक स्वाती हवेले यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, अशोक पवार, दिलीप बोठे, नवनाथ दळवी, राजू पठाण, जमीर शेख, आर.जी. मोरे, बी.एस. शेळके, एन.एम. बांगर, डी.बी. झगडे आदी उपस्थित होते.
सदर प्रश्नाबाबत वेतन पथक अधीक्षक हवेले यांच्याशी चर्चा करुन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याशी देखील संपर्क साधण्यात आला. हवेले यांनी जुलै महिना अखेर सर्व प्रलंबीत वैद्यकीय बिले अदा केले जाणार असल्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील सर्व शाळांचे नियमित वेतन वेळेवर केले जात असल्यामुळे शिक्षणाधिकारी कडूस व वेतन पथक अधीक्षक हवेले यांचे जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतरांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
मागील दोन वर्षापासून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे वैद्यकीय देयके, सर्व प्रकारची पुरवणी देयके, सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक, शिक्षकेतर यांची रजा रोखीकरणाची व भविष्य निर्वाह निधीची प्रलंबित देयके व सेवेत असणार्या काही शिक्षक, शिक्षकेतरांची ना परतावा, भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे, अंशतः 20 टक्के व 40 टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचार्यांची नियमित वेतन देयके व फरक बिले, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता, प्रलंबित शालार्थ आयडीची प्रकरणे मार्गी लावण्याची सातत्याने मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा वरील प्रश्न संदर्भात निवेदन देण्यात आलेली आहे. प्रत्येक वेळी कोरोना महामारीमुळे शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे व शिक्षण उपसंचालक कार्यालयाची नियमित वेतन देयके व्यतिरिक्त इतर पुरवणी व वैद्यकीय देयके पारित करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे सदरील अनेक देयके अदा झालेले नसल्याने ही देयके प्रलंबित राहिलेली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जुलै पेड इन ऑगस्टच्या नियमित वेतना बरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतरांचे वैद्यकीय देयके व वरील सर्व प्रलंबित देयके देण्यासाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.