• Wed. Dec 11th, 2024

जुने जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत इतर सरकारी कार्यालयासाठी उपलब्ध करुन देण्याच्या हालचाली सुरु

ByMirror

Apr 1, 2022

पीपल्स हेल्पलाईन संघटनेचे आंदोलन तात्पुरते स्थगित

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचे पड असलेल्या इमारती लवकरच इतर खात्यातील सरकारी कार्यालयांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी कळविल्याने पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने जारी केलेले सत्यबोधी सूर्यनामा आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. तर येत्या पंधरा दिवसात याबाबत ठोस निर्णय न झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी (दि.14 एप्रिल) जुने जिल्हाधिकारी कार्यालया समोर सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय नगर- औरंगाबाद महामार्गावरील शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतर झाले. जुने जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतीमधील विविध विभाग रिकामे पडून आहेत. जुनी इमारतीमध्ये शहरात भाड्याने असलेले इतर सरकारी कार्यालयांना देण्याची मागणी संघटनेने केली आहे. मात्र जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. अनेक सरकारी कार्यालय भाड्याच्या जागेत असून, राज्य सरकार दर महिन्याला लाखो रुपये भाड्यापोटी भरत आहे. हा पैसा वाचविण्यासाठी व पड असलेल्या शासकीय इमारतीचा योग्य वापर होण्यासाठी संघटनेने आग्रह धरला आहे. एकंदरीत अनागोंदी आणि टोलवाटोलवीमुळे हा प्रश्‍न प्रलंबीत पडला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊन भाडे भरणारे इतर सरकारी कार्यालयांना जुने जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत उपलब्ध करुन देण्यासाठी प्रजासत्ताक अधिकाराचा वापर करुन प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मागणीसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *