अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष
वन विभागाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे वृक्षतोड सुरु असल्याचा आरोप
अहमदनगर(प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील पूर्व भागात बेकायदा वनतोड त्वरीत थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. बेसुमार वृक्षांची कत्तल होत असताना या प्रकरणाला पाठिशी घालणार्या संबंधित वन अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. वृक्षरोड थांबून संबंधितांवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, मुंगी, सुकळी, बालम टाकळी, कांबी, शेकरे, चापडगाव, खामपिंपरी, गदेवाडी, जाड जळगाव मध्ये वन विभागाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या गावाच्या शिवारात अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून दररोज पाच ते सहा टेम्पो भरुन बेकायदा वृक्षतोड केली जाते. यामुळे राष्ट्रीय पर्यावरणाचा र्हास होत चालला असून, त्यास शेवगाव वन विभाग जबाबदार आहे. या भागातील वृक्षतोडीचा पंचनामा करण्यासाठी उपवनसंरक्षक विभाग कार्यालयामार्फत समिती स्थापन करण्यात यावी, या भागात वृक्षतोड करणार्यांवर गुन्हे दाखल करावे, वृक्ष तोड करणार्यांना पाठिशी घालणार्या वन अधिकार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.